ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना खूप राग येतो. त्यांच्या चिडक्या स्वभावाचे बरेच किस्से आपण इतर कलाकारांकडून ऐकले आहेत. इंडस्ट्रीमध्ये तर नाना यांच्याबरोबर काम करायलादेखील बरेच कलाकार घाबरतात. अशातच नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते एका चाहत्याला डोक्यावर जोरदार फटका मारताना दिसले. सेल्फी काढायला आलेल्या चाहत्याला त्यांनी मारल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत होतं.
इतकंच नव्हे तर ते रागाने त्या मुलावर ओरडतानाही दिसले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आणि यावरून त्यांना प्रचंड ट्रोलही केलं गेलं. नाना सध्या ‘गदर २’ चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या आगामी ‘जर्नी’ या चित्रपटात झळकणार आहेत. यात अनिल शर्मांचा मुलगा उत्कर्षदेखील आहे. या चित्रपटाची कथा डिमेन्शियाने ग्रस्त वडील आणि त्यांचा मुलगा यांच्यातील नात्याभोवती फिरते.
आणखी वाचा : बिग बींच्या पडत्या काळात सुब्रतो रॉय यांनी दिलेला आधार; ‘या’ नेत्यामुळे झाली बिग बी व सहाराश्री यांची मैत्री
नाना पाटेकर सध्या वाराणसीमध्ये याच चित्रपटाचं शूटिंग करत आहेत. यावेळी एक चाहता तिथे सेल्फीसाठी येतो. शूटिंग चालू असताना त्याने सेल्फीसाठी शॉटमध्ये व्यत्यय आणल्याने नाना यांना राग अनावर झाला व त्यांनी त्याच्या डोक्यावर जोरदार फटका मारला. तसेच त्याला तिथून निघून जायला सांगितल्याचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे नाना यांच्यावर बरीच टीकाही होत आहे. आता मात्र या व्हिडीओमागील सत्य समोर आलं आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी याबाबतीत स्पष्टीकरण दिल्याचं समोर आलं आहे. नाना यांनी चाहत्याला मारलेलं नसून हा चित्रपटातील एक शॉट असल्याचं अनिल शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे. हा ‘जर्नी’मधीलच एक सीन असल्याचं अनिल शर्मा यांनी सांगितलं आहे. अनिल शर्मा यांच्या या स्पष्टीकरणामुळे या व्हिडीओमगील नेमकं सत्य समोर आलं आहे. नाना पाटेकरांचा द व्हॅक्सिन वॉर चित्रपट सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रदर्शित झाला होता. पण या चित्रपटाला प्रेक्षकांनी नाकारलं. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट करोना काळात शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या स्वदेशी लस निर्मितीवर आधारित होता.