अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २’ चित्रपटाने ३०० कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या शुक्रवारी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे २० कोटींची कमाई केली. सनी देओलचा ‘गदर २’ ११ ऑगस्ट रोजी अक्षय कुमारच्या ‘ओएमजी २’ला टक्कर देत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. पण तरी ‘गदर २’ इतर चित्रपटाला मागे टाकत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
२००१ साली आलेला ‘गदर – एक प्रेम कथा’ या चित्रपटासाठी अभिनेता गोविंदा ही पहिली पसंती असल्याचं सांगितलं जात होतं. नुकतंच दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी या गोष्टीवर स्पष्टीकरण दिलं आहे. गोविंदा या चित्रपटासाठी पहिली पसंती नव्हता हे त्यांनी या नव्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे.
आणखी वाचा : शाहरुखचा ‘जवान’ पहिल्याच आठवड्यात कमावणार ४०० कोटी; प्रसिद्ध अभिनेत्याची भविष्यवाणी
‘बॉलिवूड हंगामा’शी संवाद साधताना अनिल शर्मा म्हणाले, “गदरसाठी गोविंदा ही माझी पहिली पसंती कधीच नव्हती. मी गोविंदाबरोबर ‘महाराजा’ चित्रपटावर काम करत होतो. तेव्हा मी त्याला ‘गदर’ची कथा ऐकवत होतो, त्याला वाटलं की मी त्याला या चित्रपटासाठी विचारत आहे. मी हा चित्रपट करणार नाही, यात हिंदू-मुस्लिम यावर बरंच भाष्य केलं आहे असं गोविंदा तेव्हा मला म्हणाला. एवढीच गोष्ट घडली होती, आणि मग नंतर ‘गदर’साठी गोविंदाची पहिली पसंती असल्याची बातमी बाहेर आली ज्यात खरंतर काहीच तथ्य नव्हतं.”
पुढे अनिल शर्मा म्हणाले, “हा गैरसमज गोविंदाच्या डोक्यात होता. अर्थात तोदेखील त्यावेळी सुपरस्टार होता. माझ्या डोक्यात मात्र एक रांगडा पंजाबी नायकच होता आणि त्यासाठी सनी देओल हा एकच पर्याय माझ्या डोळ्यासमोर होता.” ‘गदर २’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेल मुख्य भूमिकेत आहेत. तब्बल दोन दशकानंतर आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.