Happy Birthday Bobby Deol: हिंदी चित्रपटसृष्टीत खासकरून बॉलिवूडमध्ये एखाद्या कलाकाराने कमबॅक करणं ही फार मोठी गोष्ट असते कारण ही इंडस्ट्री सगळ्यांनाच दुसरी संधी देत नाही. इथे एकदा फ्लॉपचा ठपका लागला की तो मिटेपर्यंत कित्येकांचं आयुष्य खर्ची जातं. मात्र एका हरहुन्नरी अभिनेत्याने सिद्ध केलं की केवळ इच्छाशक्तिच्या जोरावरही बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅक करता येतं अन् सगळ्यांची तोंडं बंद करता येतात. तो अभिनेता म्हणजे बॉलिवूडच्या पहिल्या ही-मॅन धर्मेंद्रच्या पोटी जन्मलेला धाकटा मुलगा विजय सिंग देओल अर्थात बॉबी देओल.
२०२३ च्या अखेरीस रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला अन् ९०० कोटींहून अधिक कमाई केली. चित्रपट वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला, पण त्यापैकी एक कारण हे भारतीय प्रेक्षकांसाठी सुखद होतं ते म्हणजे बॉबी देओलचा कमबॅक. ‘अॅनिमल’मध्ये रणबीरपेक्षा जास्त चर्चा उपेंद्र लिमये, तृप्ती डीमरी व बॉबी देओलचीच झाली. ‘जमाल कुडू’ या इराणी लोकगीतावर दारूचा ग्लास डोक्यावर ठेवून मस्त थिरकणाऱ्या बॉबीचा हा अवतार पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुरतेने वाट बघत होते. कमबॅक कसा असावा हे बॉबीने दाखवून दिलं, पण तुम्हाला माहितीये का सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या बॉबी देओलला मिळालेलं स्टारडम टिकवता आलं नव्हतं. आज बॉबीच्या याच प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
आणखी वाचा : आयुष्मान खुरानाचा ‘दिल दिल पाकिस्तान’ गाणं गातानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय? जाणून घ्या
१९९५ मध्ये राजकुमार संतोषी यांच्या ‘बरसात’मधून बॉबी देओलने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ९० चं दशक अन् सलमान, शाहरुख आणि आमिर या तिघांनी आपापलं बस्तान बसवलं होतं. अक्षय कुमार, अजय देवगण, सनी देओल व अनिल कपूर हे केवळ त्यांच्या हटके चित्रपटांमुळे या वादळात तग धरून होते. अशातच बॉबी देओलने एका रोमॅंटिक लव्ह स्टोरीमधून एंट्री घेतली अन् रातोरात स्टार झाला, लोकांनी बॉबीला डोक्यावर घेतलं खरं पण नंतर नवनवे कलाकार पुढे आले अन् त्यांच्या गर्दीत बॉबी हरवून गेला. यशाच्या शिखरावर असतानाच बॉबीने एक आणखी मोठा निर्णय घेतला. त्याने १९९६ मध्ये तानिया आहुजाशी लग्नगाठ बांधली. बॉबीने नंतर वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट केले, मसालापट, सस्पेन्स थ्रिलर, खलनायक, अशा वेगवेगळ्या माध्यमातून बॉबीने प्रेक्षकांना वेगळं काहीतरी द्यायचा प्रयत्न केला.
‘बरसात’नंतर ‘गुप्त’, ‘सोल्जर’, ‘करीब’, ‘और प्यार हो गया’, ‘दिल्लगी’, ‘बिछु’, ‘अजनबी’, ‘हमराज’सारख्या चित्रपटातून बॉबीने त्याच्यातील अभिनयाची चुणूक दाखवली. २००० साल उजाडल्यानंतर मात्र बॉबीचे चित्रपट, त्याची निवड आणि एकूणच त्याचं पुढील करिअर हे भरकटायला सुरुवात झाली. कधी तो ‘टँगो चार्ली’, ‘झुम बराबर झुम’सारख्या चित्रपटात वेगळ्याच भूमिका करायचा तर कधी ‘यमला पगला दिवाना’ व ‘थॅंक यु’सारख्या विनोदी चित्रपटात झळकायचा. ‘दोस्ताना’ किंवा ‘पोस्टर बॉइज’सारखी एखाद दुसरी वेगळी भूमिका वगळता बॉबी अक्षरशः बळजबरी अभिनय करत होता असं बऱ्याच लोकांच्या ध्यानात आलं. हीच ती वेळ होती जेव्हा बॉबीचा स्वतःवरचा विश्वास कमी व्हायला सुरुवात झाली, चित्रपट बॉक्स ऑफिसवर पडू लागले, कालांतराने चित्रपट मिळणंही बंद झालं अन् नंतर हळूहळू बॉबी दिसेनासा झाला.
यादरम्यान तो फार डिप्रेशनमध्ये होता, त्याला दारूचंही व्यसन लागलं होतं. या काही गोष्टींबद्दल त्याने करण जोहरच्या चॅट शोमध्ये भाष्य केलं. या मुलाखतीमध्ये बॉबी म्हणाला, “मी आशा सोडली होती. मला स्वतःचीच कीव यायची. याच काळात मी भरपुर दारू प्यायला लागलो. मी फक्त घरात बसून होतो आणि इतरांना दोष द्यायचो की कुणी माझ्याबरोबर काम का करू इच्छित नाही? मी चांगला नट आहे तर माझ्याबरोबर कुणीच काम का करत नाही? असे नकारात्मक विचार सतत माझ्या डोक्यात यायचे. माझ्या आजूबाजूला सकारात्मकतेचा लवलेशही नव्हता. मी फक्त घरी बसून असायचो आणि माझी पत्नी काम करायची.”
आणखी वाचा : एकेकाळी आंबे विकायचा अमिताभ बच्चन यांचा जावई; आज आहे कोट्यवधीच्या संपत्तीचा मालक
बॉबीची अशी अवस्था पाहून ही गोष्ट त्याच्या लहान मुलाच्या निदर्शनास आली अन् जेव्हा त्याच्या मुलांच्या तोंडून बॉबीने एक वाक्य ऐकलं तेव्हा मात्र त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. याविषयी बॉबी म्हणाला, “एकेदिवशी मी माझ्या मुलाला बोलताना ऐकलं की त्याचे वडील फक्त घरात बसून असतात अन् आई बाहेर जाऊन काम करते, त्यावेळी मी कुठे चुकतोय याची जाणीव झाली आणि मी यातून बाहेर पडायचं ठरवलं. अर्थात मला त्यातून बाहेर यायला वेळ लागला.”
२०१८ मध्ये बॉबी देओलला सलमान खानने ‘रेस ३’मध्ये संधी दिली अन् बॉबीने त्याचं सोनं केलं. चित्रपट सुपरफ्लॉप ठरला असला तरी बॉक्स ऑफिसवर याची चर्चा झाली अन् बॉबी देओलच्या करिअरला एक किकस्टार्ट मिळाली. त्यानंतर लगेचच ‘हाऊसफूल ४’मध्येही बॉबीची वर्णी लागली. चित्रपट विश्वात पुन्हा येऊ पाहणारा बॉबी आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपला ठसा उमटवू पहात होता. २०२० हे वर्षं बॉबीसाठी अत्यंत खास ठरलं. ‘क्लास ऑफ ८३’ हा नेटफ्लिक्सचा चित्रपट आणि ‘आश्रम’ ही प्रकाश झा यांची वेब सीरिज एका पाठोपाठ प्रदर्शित झाले अन् पुन्हा एकदा बॉबीचं नाव सर्वत्र घेतलं जाऊ लागलं. दोन्ही कलाकृतीमधील बॉबीचं काम लोकांना पसंत पडलं. खासकरून प्रकाश झा यांच्या ‘आश्रम’मधला कपटी, धूर्त पण चेहऱ्यावर यापैकी एकही भाव न दाखवणारा काशीपूरवाला बाबा निराला ही भूमिका बॉबीने अगदी चोख निभावली. या वेब सीरिजमुळे बॉबीला स्वतःमधला हरवलेला अभिनेता पुन्हा गवसला अन् त्याने मागे वळून पाहिलं नाही.
बॉबीला ‘लॉर्ड बॉबी’ हे नाव कसं पडलं त्यामागेदेखील एक भन्नाट किस्सा आहे. बॉबीच्या चाहत्यांनी खास त्याच्यासाठी ट्विटरवर एक पेज सुरू केलं ज्याचं सुरुवातीला नाव होतं ‘बॉबीवूड’. खास बॉबीच्या चित्रपटातील काही सीन्स तसेच मीम्स आणि फोटोज या पेजवर शेअर केले जायचे. ‘अॅनिमल’च्या प्रदर्शनादरम्यान त्या पेजचं नाव बदलून ‘लॉर्ड बॉबी’ करण्यात आलं. त्याच्या चाहत्यांच्या मते बॉबीचे बरेचसे चित्रपट हे काळाच्या पुढचे होते अन् म्हणूनच तेव्हा ते कित्येकांच्या पचनी पडले नसावे. ‘अॅनिमल’ची जशी हवा होऊ लागली तसंच या ट्विटर पेजवरुनही बऱ्याच गोष्टी शेअर केल्या जाऊ लागल्या अन् अशारीतीने बॉबीला ‘लॉर्ड बॉबी’ही नवी ओळख मिळाली.
बॉबी देओल हा काही सगळ्यांनाच आवडेल असा नट नाही, त्यालाही बऱ्याच मर्यादा आहेत, तो अगदी परिपूर्ण नट नसला तरी त्याच्याकडून तो १००% द्यायचा प्रयत्न करतो हे त्याच्या आजवरच्या प्रत्येक कामातून सिद्ध झालं आहे. तो काही सलमानसारखा माचो मॅन नाही, आमिरसारखा परफेक्ट नाही की शाहरुखसारखा रोमान्समध्ये पारंगत नाही. पण तो त्याचे वडील आणि भावाप्रमाणे प्रामाणिक आहे अन् म्हणूनच २०२३ मध्येसुद्धा केवळ १५ मिनिटांच्या सीनमधून त्याने सारी चित्रपटसृष्टी हादरवून सोडली आहे. तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जरी जन्माला आलेला असलात तरी योग्य वेळ तुमच्या नशिबात असणं फार आवश्यक आहे. बॉबीने भलेही १९९५ मध्ये पहिला चित्रपट दिला असला तरी एक अभिनेता म्हणून त्याची खरी कारकीर्द ही आत्ता सुरू झालीये असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. ५४ व्या वर्षी आपल्या फिल्मी करिअरची सेकंड इनिंग थाटात सुरू करणाऱ्या ‘लॉर्ड बॉबी’ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.