रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांबाहेर गर्दी केली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तब्बल ९०० कोटींहून अधिक कमाई केली. चित्रपटात दाखवलेल्या बऱ्याच दृश्यांवरुन वाद निर्माण झाला. चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यावरही प्रचंड टीका झाली. सामान्य प्रेक्षकांपासून सेलिब्रिटीजपर्यंत कित्येकांनी या चित्रपटावर भाष्य केलं. बॉबी देओलने या चित्रपटातून दमदार कमबॅक केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉबीने यात खलनायक अब्रार हक हे पात्र साकारलं. नुकताच बॉबीला या चित्रपटासाठी उत्कृष्ट खलनायकाचा दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला. बॉबीने साकारलेलं हे पात्र फारच क्रूर, हिंसक दाखवल्याने त्याच्या या पात्रावरही टीका झाली. काहींना बॉबीचं हे पात्र फार आवडलं तर काहींना ते अजिबात पटलं नाही. ‘झी सिने अवॉर्ड २०२४’च्या पत्रकार परिषदेदरम्यान बॉबीने पत्रकारांशी संवाद साधतांना त्याच्या या पात्राबद्दल भाष्य केलं.

आणखी वाचा : “एका मोर्चा धारक ‘महापुरुषांनी’…” अभिनेत्री केतकी चितळेची ‘ती’ फेसबुक पोस्ट चर्चेत

बॉबी म्हणाला, “मला अशाच आव्हानात्मक भूमिका करायच्या आहेत, ज्या साकारताना माझ्यातील अभिनय कौशल्याचा कस लागेल. सकारात्मक भूमिका आणि नकारात्मक भूमिका असं काहीच नसतं. पूर्वी कॉमेडीयन, व्हिलन आणि हीरो असं विभाजन केलं जायचं, पण आता तसं राहिलेलं नाही. काळानुसार चित्रपट, कथा सादर करायची पद्धत बदलली आहे.”

आपल्या पात्राबद्दल मिळणाऱ्या संमिश्र प्रतिक्रियांबद्दल बॉबी म्हणाला, “माझ्यासाठी ही नकारात्मक भूमिका पेलणं हे एक मोठं आव्हानच होतं. आपल्या सगळ्यांमध्ये अशा काही वाईट गोष्टी आहेत अन् जेव्हा आपण त्यावर मात करतो तेव्हाच आपण एक चांगला माणूस म्हणून घडतो. यासाठी अशा नकारात्मक पात्रांची फार मदत होते. चित्रपटातील माझं पात्र अब्रार असा का झाला यामागेही काही ठोस कारणं आहेत. मी जेव्हा ते पात्र साकारलं तेव्हा मी ते नकारात्मक आहे किंवा खलनायक आहे असा विचार केला नाही, ते पात्र त्याच्या कुटुंबाचा हीरो आहे अशाच दृष्टीने मी त्याकडे पाहिलं.”

मध्यंतरी ‘अ‍ॅनिमल’चे मार्केटिंग डायरेक्टर वरुण गुप्ता यांनी ‘झुम’शी संवाद साधताना अब्रार हकच्या स्पिन ऑफ चित्रपटाबद्दल भाष्य केलं होतं. खास बॉबीसाठी त्याचं कथानक सादर करणारा एक स्वतंत्र चित्रपट येणार असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली होती. वरुण म्हणाले, “संदीप सरांना अजून याबद्दल विचार करायला व लिखाणाला वेळ मिळालेला नाही, परंतु बॉबीच्या पात्राच्या स्पिन-ऑफबद्दल चर्चा सुरू आहे, सगळेच यावर आपापली मतं देत आहेत, परंतु अजून यावर शिक्कामोर्तब झालेले नाही.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animal actor bobby deol says there is nothing like positive or negative character avn