रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अॅनिमल’ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. ‘अॅनिमल’चं दिग्दर्शन ‘कबीर सिंग’ फेम संदीप रेड्डी वांगाने केलं आहे. आतापर्यंत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी करत तब्बल ८०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटात रणबीरच्या बरोबरीनेचे बॉबी देओल, तृप्ती डीमरी यांच्या अभिनयाचंही प्रचंड कौतुक होताना दिसत आहे.
चित्रपटाचं जेवढं कौतुक झालं त्याहून कित्येकपटीने याचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यावर टीकाही झाली. विषारी पुरुषत्व, हिंसाचार, नग्न दृश्य अशा बऱ्याच गोष्टींचा ‘अॅनिमल’मध्ये भडिमार असल्याने दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यावर टीका झाली. चित्रपटसृष्टीतीलही बऱ्याच बड्याबड्या सेलिब्रिटीजनी संदीप यांच्यावर टीका केली. प्रसिद्ध कवि व लेखक जावेद अख्तर यांनीही या चित्रपटावर टीका केली होती.
“एका सिनेमातला एक पुरुष महिलेला म्हणतो की माझे बूट चाट, जर एक माणूस म्हणतो की महिलेला थोबाडीत ठेवून दिली तर काय बिघडलं. असे संवाद असणारा सिनेमा सुपरहिट होणं ही अत्यंत घातक बाब आहे.” असं वक्तव्य जावेद अख्तर यांनी चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा केलं होतं. जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावर आता संदीप रेड्डी वांगा यांनी भाष्य केलं आहे. दुसऱ्यांच्या कामावर बोट ठेवण्याआधी त्यांनी आधी आपल्या मुलाचे काम पहावे अशी विनंती संदीप यांनी केली आहे.
यूट्यूबर सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये संदीप म्हणाले, “त्यांच्या वक्तव्यावरुन हे स्पष्ट झालं की त्यांनी चित्रपट पूर्णपणे पाहिलेला नाही. एखादी व्यक्ति चित्रपट न बघताच त्यावर भाष्य करत असेल तर त्याला मी तरी काय करणार? आजवर जेवढ्या लोकांनी या चित्रपटावर टीका केली आहे त्यांनी त्यांच्या आजूबाजूला काय घडतंय ते पहायचे कष्ट का घेतले नाहीत?
पुढे संदीप म्हणाले, “हीच गोष्ट जावेद अख्तर यांनी त्यांचा मुलगा फरहानला का सांगितली नाही जेव्हा तो ‘मिर्झापूर’सारखी सीरिज बनवत होता. त्या सीरिजमध्ये जगातल्या सगळ्या शिव्यांचा वापर करण्यात आला आहे अन् मला ती सीरिज पूर्णपणे बघवलीही गेली नाही. तुम्ही जर ती सीरिज पाहिलीत तर तुम्हाला उलटी येईल. त्यामुळे जावेद अख्तर हे त्यांच्या मुलाच्या कामावर का लक्ष ठेवत नाहीत?”