‘लैला मजनू’, ‘पोस्टर बॉईज’, ‘काला’, ‘बुलबुल’, ‘बॅड न्यूज’, ‘अॅनिमल’ या चित्रपटांतून अभिनेत्री तृप्ती डिमरीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘अॅनिमल’ या चित्रपटामुळे या अभिनेत्रीला मोठी प्रसिद्धी मिळाली. आता एका मुलाखतीदरम्यान, तिच्या अभिनय क्षेत्रातील करिअरविषयी वक्तव्य तिने केले आहे.
काय म्हणाली अभिनेत्री?
‘द हॉलीवूड रिपोर्टर ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटले, “मी अभिनयाकडे कधी करिअरच्या दृष्टिकोनातून पाहिले नव्हते. मला फक्त काहीतरी वेगळे करायचे होते. मी शाळेत फार हुशार नव्हते. मी माझ्या पालकांना सांगितले की, मी मॉडेलिंगमध्ये प्रयत्न करणार आहे. मी मुंबईला शिफ्ट होणार होते, त्यावेळी माझे पालक नाखूश होते. कारण- मी खूपच लाजरीबुजरी होते. मी अंतर्मुख व्यक्ती असून, त्याआधी दिल्लीबाहेर कधीच पाऊल ठेवले नव्हते. मॉडेलिंगमध्ये प्रवेश करण्याचा माझा निर्णय सुरुवातीला त्यांना पटला नाही; मात्र मी त्याचा सतत पाठपुरावा करीत राहिले. कारण- मला पश्चात्ताप करायचा नव्हता.”
पुढे बोलताना अभिनेत्रीने सांगितले, “मला या क्षेत्रात काम करायचे आहे, असे मी ठरविल्यानंतर मी मोठ्या प्रमाणात चित्रपट आणि टीव्ही मालिकांसाठी ऑडिशन द्यायला सुरुवात केली. मला २०१७ ला ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये श्रेयस तळपदे, बॉबी देओल व सनी देओल हे कलाकार होते. पण, मला इंडस्ट्रीमधली काहीच माहिती नसल्याने सगळ्या गोष्टी फार कठीण वाटल्या. काही संज्ञा असतात, त्यादेखील मला माहीत नव्हत्या. त्यामुळे सुरुवातीचा काळ फार कठीण होता. उदाहरणार्थ, डीओपी (DOP)चा डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी (Director of photography)असा अर्थ मला माहीत नव्हता. मी नीट काम करू शकत नव्हते. कारण- मला अभिनयाचा ‘अ’सुद्धा माहीत नव्हता. मात्र, देओल बंधूंबरोबर काम केल्यामुळे माझ्या पालकांची चिंता कमी झाली. याच काळात मी अभिनयाला संधी देण्याचे ठरवले.”
तृप्तीने ‘लैला मजनू’ या चित्रपटाविषयी बोलताना म्हटले, “जेव्हा सुरुवातीला मी ‘लैला मजनू’ चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते. त्यावेळी सिलेक्ट झाले नव्हते. मात्र, कास्टिंग डायरेक्टरने मला पुन्हा एकदा ऑडिशन द्यायची संधी दिली आणि मी त्या चित्रपटाचा भाग झाले. पण, त्यावेळीसुद्धा मला अभिनयाबद्दल फारसे माहीत नव्हते. मी आमचे डायरेक्टर साजिद अली आणि सहकलाकार अविनाश तिवारी यांच्याबरोबर वर्कशॉपमध्ये बसत असे. ते अभिनय, पात्रे यांच्याबद्दल बोलत असत. मी फक्त तिथे निर्विकार चेहऱ्याने बसत असे. मला काहीच कळत नसे. मला काहीच समजत नाही म्हणून मी घरी जाऊन रडत असे. मी खूप घाबरलेले होते. तुम्हाला एखादी गोष्ट समजत नसेल, तर तुम्हाला मूर्ख असल्यासारखे वाटते. त्यावेळी मला प्रत्येक दिवशी मी मूर्ख असल्यासारखे वाटायचे. साजिद अलींमुळे मी लैलाचे पात्र समजून घेऊ शकले.” अशी आठवण तृप्तीने सांगितली आहे.
दरम्यान, ती लवकरच राजकुमार रावबरोबर ‘विक्की विद्या का वो वाला व्हिडीओ’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.