Animal हा सिनेमा १ डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे. या सिनेमावरुन उलटसुलट प्रतिक्रिया समोर येत आहेत. अॅनिमल सिनेमात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल, दिप्ती डिमरी, अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमावरुन काही वाद निर्माण झाले आहेत. अशात या सिनेमाचा वाद आता थेट संसदेत पोहचला आहे. काँग्रेस खासदार रंजीत रंजन यांनी माझी मुलगी चित्रपटाच्या मध्यातूनच थिएटरमध्ये बाहेर पडल्याचं म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे रंजीत रंजन यांनी?
रंजीत रंजन म्हणाल्या, “सिनेमा हा समाजमनाचा आरसा असतो. आम्हीही लहान असल्यापासून सिनेमा पाहत आलो आहे. मात्र आत्ता जे चित्रपट येत आहेत त्यांचा तरुणाईवर गंभीर परिणाम होतो आहे. ‘कबीर सिंग’, ‘अॅनिमल’, ‘पुष्पा’ यांसारख्या चित्रपटांमधून तरुणाईला काय शिकायला मिळेल? माझ्या मुलीच्या महाविद्यालयात अनेक मैत्रिणी आहेत, ज्या महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकत आहेत. चित्रपट पाहताना माझ्या मुलीला रडू कोसळलं आणि ती मधेच उठून निघाली. चित्रपटात महिलांचा विनयभंग दाखवण्यात आला आहे. हिंसा तर इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे. तेच तिला पटलं नाही.”
रंजीत रंजन यांनी कबीर सिंगचीही दिलं उदाहरण
रंजीत रंजन यांनी संदीप रेड्डी वांगाच्या कबीर सिंगचंही उदाहरण दिलं. त्या म्हणाल्या, “‘कबीर सिंग’ मधूनही काय सांगितलं आहे? तो ज्या पद्धतीने वागतो ते योग्य आहे म्हणायचं का? लोकांशी तो कसा वागतो? पत्नीशी कसा वागतो? त्याचं समर्थन होतंय. हा विषय विचार करायला भाग पाडणारा आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या हिंसक दृश्यांचा महाविद्यालयीन मुलांवर काय परिणाम होतो? तर ते अशा भूमिकांना आदर्श मानू लागतात. त्यामुळे समाजातही अशी हिंसा दिसून येते.” असं म्हणत रंजीत रंजन यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
Animal या सिनेमात हिरो महाविद्यालयात मशीनगन घेऊन जाताना दाखवला आहे. त्याला कुठलाही कायदा आड येत नाही. दोन कुटुंबातली लढाई, तिरस्कार हे सगळं काय दर्शवत आहेत? जे काही सिनेमात दाखवण्यात आलं आहे ते चुकीचं आहे. सेन्सॉर बोर्ड अशा सिनेमांना प्रमाणपत्र कसं काय देतो? अशा चित्रपटांना आपल्या समाजात काही स्थानच नको असंही रंजीत रंजन यांनी म्हटलं आहे.