१ डिसेंबर रोजी दोन बॉलीवूड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. दोन्ही चित्रपटांची बऱ्याच दिवसांपासून चर्चाही होती आणि प्रेक्षकांमध्ये उत्सुकताही होती. पहिला चित्रपट म्हणजे संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’. यामध्ये रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना अशी तगडी स्टारकास्ट आहे. तर दुसरा चित्रपट म्हणजे ‘सॅम बहादुर’. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. तर सान्या मल्होत्रा व फातिमा सना शेख यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या दोन्ही चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे.
‘सॅम बहादुर’ हा भारताचे माजी लष्करप्रमुख आणि फिल्ड मार्शल पदावर बढती मिळालेले पहिले भारतीय लष्कर अधिकारी सॅम माणेकशा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. ‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी देशभरात ५.५ कोटी रुपयांची कमाई केली. दुसरीकडे ‘अॅनिमल’ हा पूर्णपणे व्यावसायिक चित्रपट आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी देशभरात तब्बल ६१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘अॅनिमल’ ची कमाई ‘सॅम बहादुर’च्या तुलनेत खूप जास्त आहे.
रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाची ग्रँड ओपनिंग, पहिल्याच दिवशी कमावले तब्बल…
‘सॅम बहादुर’ व ‘अॅनिमल’ या चित्रपटाचे विषय एकमेकांपासून वेगळे आहेत. दोन्ही वेगळ्या धाटणीचे चित्रपट आहेत. ‘सॅम बहादुर’ हा सॅम माणेकशा यांचं भारतीय लष्करातील योगदान, त्यांचा जीवनप्रवास, त्यांची देशभक्ती प्रेक्षकांसमोर मांडतो, तर ‘अॅनिमल’ हा बाप-लेकाच्या विचित्र नात्याची गोष्ट सांगणारा चित्रपट आहे. पहिल्या दिवसाची आकडेवारी पाहता ‘सॅम बहादुर’च्या कमाईला मोठा फटका बसला आहे आणि ‘अॅनिमल’ चित्रपटाने एकहाती बॉक्स ऑफिसवर राज्य केलं आहे.
आनंद महिंद्रांनी केला ‘सॅम बहादूर’ चा थोडक्यात रिव्ह्यू, चित्रपट पाहण्यापूर्वी नक्की वाचा!
दरम्यान, दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होण्याबद्दल विकी कौशलला विचारण्यात आलं होतं. तेव्हा विकीने कोणतीही स्पर्धा किंवा क्लॅश नसल्याचं म्हटलं होतं. “मी याचं उत्तर क्रिकेटच्या भाषेत देईन. जेव्हा दोन सलामीवीर फलंदाज एकाच संघाकडून खेळण्यासाठी क्रिजवर येतात, त्यावेळी हे दोन्ही फलंदाज एकमेकांविरोधात खेळत आहेत, असं आपण म्हणू शकत नाही. कारण ते एकाच संघासाठी खेळत आहेत. आम्हीही हिंदी सिनेमासाठी काम करत आहोत. यापैकी एखादा फलंदाज कदाचित चौकार, षटकार लगावेल आणि दुसरा एक-दोन धावा काढून खेळपट्टीवर टिकून राहील आणि स्ट्राइक मेंटेन करेल,” असं विकी ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होता.