करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. रणवीर-आलियासह या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखेला प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे. चित्रपटात अभिनेत्री अंजली आनंदने ‘गायत्री रंधावा’ची म्हणजेच रणवीरच्या बहिणीची भूमिका साकारली आहे. अंजलीच्या भूमिकेचे अलीकडे सर्वजण कौतुक करत आहेत. मात्र, ‘गायत्री रंधावा’साठी ऑडिशन देणे अंजलीसाठी सोपे नव्हते याबाबत नुकत्याच सिद्धार्थ कन्नला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने खुलासा केला आहे.
अंजली आनंद चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल सांगताना म्हणाली, “‘रॉकी और रानी…’च्या कास्टिंग दिग्दर्शक शानू शर्मा यांचा मला फोन आला होता. त्यांनी करणला काही लोकांनी तुझे नाव गायत्रीच्या भूमिकेसाठी सुचवले आहे असे सांगितले. तसेच करण जोहरला मी तुझे इन्स्टाग्राम प्रोफाइल दाखवले असेही त्या म्हणाल्या. माझ्या मते, माझे इन्स्टा अकाऊंट फारसे चांगले नाही. यानंतर शानूने मला चार ओळींचा सीन पाठवला आणि ऑडिशन शूट करून पाठव असे सांगितले.”
हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी चिन्मय मांडलेकर पाळतो ‘हे’ नियम; म्हणाला, “देशाचे पंतप्रधान आले तरी…”
अंजली आनंद पुढे म्हणाली, “टीव्ही मालिकांमध्ये मी अनेक वर्ष काम करत असल्याने त्याठिकाणी १५ पानांचा सीन मी एका टेकमध्ये न डगमगता, पूर्ण आत्मविश्वासाने करते. पण, ‘रॉकी और रानी…’च्या ऑडिशनसाठी पाठवलेल्या चार ओळींवर सीन करताना मला पॅनिक अटॅक येत होते. शानूने पाठवलेला सीन करण्यासाठी मी २०० टेक घेतले. या सगळ्या गोष्टी खऱ्या असून मी अजिबात चेष्ठा करत नाही. २०० टेक घेऊनही ऑडिशन नीट होत नसल्याने मी खूप रडायला लागले.”
हेही वाचा : लष्करी अधिकाऱ्यांनी ‘गदर २’ पाहिल्यानंतर दिला रिव्ह्यू, त्यांना कसा वाटला चित्रपट? जाणून घ्या
“४ तास टेक घेऊन फायनल टेक जो मी शूट करून ऑडिशनसाठी पाठवला तो मला मनापासून आवडला होता. तो सीन पाहिल्यावर अंजली मागच्या ४ तासांपासून तू काय करत होतीस? असे अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले होते. शानू आणि करणने ऑडिशनचा व्हिडीओ पाहिला आणि मला चित्रपटासाठी निश्चित करण्यात आले. मला माझ्या नशिबावर विश्वास बसत नव्हता.” असे अंजली आनंदने सांगितले.