अभिनेत्री अंजना सुखानी(Anjana Sukhani)ने निखिल अडवाणी दिग्दर्शित ‘सलाम-ए-इश्क’ या मल्टी स्टारर चित्रपटात काम केले होते. आता एका मुलाखतीत अभिनेत्रीने या चित्रपटात काम करण्याचा अनुभव अतिशय भयावह असल्याचे म्हटले आहे. सेटवर निखिल अडवाणी तिच्याशी वाईट वागला आणि तिला कोणतीही पूर्वसूचना न देता, अनिल कपूर यांच्याबरोबर किसिंग सीनचे शूटिंग करण्यास त्याने सांगितले होते, असा तिने खुलासा केला.
नाइट क्लबसारख्या ठिकाणी…
अभिनेत्रीने नुकतीच ‘बॉलीवूड हंगामा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने म्हटले की, इंडस्ट्रीतील इतर लोक एखादी नवीन व्यक्ती आली की, असा विचार करतात की, तिला कशीही वागणूक दिली तरी चालू शकते. कारण- ते कोणालाही जबाबदार नसतात. कलाकारांच्या मुलांनादेखील अशी वागणूक मिळते का, असा प्रश्न विचारल्यानंतर अभिनेत्रीने एक आठवण सांगत म्हटले की, चित्रपटातील एक किसिंग सीन नाइट क्लबसारख्या ठिकाणी शूट होणार होता. मला आधी त्याबद्दल कोणतीही कल्पना दिली गेली नव्हती. सेटवर जाण्याआधी काही क्षणांपूर्वी मला याबद्दल समजले. हे कलाकारांच्या मुलांबरोबर कधीही होणार नाही.
जर किसिंग सीनबद्दल स्क्रिप्टमध्ये काही लिहिले नव्हते, तर त्यावर अभिनेत्रीने प्रश्न का उपस्थित केला नाही? त्यावर अंजना सुखानीने म्हटले की, मी त्या मन:स्थितीत नव्हते, घाबरले होते. माझ्या आजूबाजूला असे कोणीही नव्हते की, ज्याच्याबरोबर मी या विषयावर बोलू शकेन. मला फक्त सांगितले की, तुला हे करायचे आहे. एक कलाकार म्हणून मला हे समजू शकते की, जर पटकथेत त्या गोष्टी असतील, तर त्या करायला हव्यात. पण, कमीत कमी त्याबद्दल मोकळेपणाने बोलले पाहिजे, सांगितले गेले पाहिजे. त्यामुळे आपण असे सीन करण्यासाठी मनाची तयारी करतो. माझ्याबरोबर जे झाले, त्यामुळे त्या गोष्टी माझ्या मनात बराच काळ होत्या. नवीन आहे म्हणून ती काहीही करेल, नाही म्हणणार नाही, हे गृहीत धरले गेले. मला त्यावेळी रडावेसे वाटत होते. कारण- काय प्रतिसाद द्यायचा, हे मला कळत नव्हते. सेटवर माझा कोणीही मित्र नव्हता. याबद्दल मी निखिल अडवाणीला कधीही कोणताच प्रश्न विचारला नाही. मात्र, माझ्या मनात त्याच्याविषयी आजही कडवटपणा आहे. जर मी त्या सीनसाठी नाही म्हटले असते, तर मला चित्रपटातून बाहेर काढण्याची शक्यता होती. चित्रपटाची गरज म्हणून तो सीन महत्त्वाचा आहे आणि तू जर तो करू शकत नसशील, तर जाऊ शकतेस, असे म्हटले जाण्याची शक्यता होती.
कोणत्याही गोष्टीसाठी मी तयार असेन हे गृहीत धरू नका. जरी मी तयार असेन, तर मला माझ्या मनाची तयारी करण्याची वेळ द्या. जर तो वेळ दिला नाही, तर ते अन्यायकारक आहे. कारण- ते असे काही एखाद्या कलाकाराच्या मुलांबरोबर करणार नाहीत.
दरम्यान, ‘सलाम-ए- इश्क’मध्ये गोविंदा, प्रियांका चोप्रा, अनिल कपूर, जॉन अब्राहम, सलमान खान, विद्या बालन व जुही चावल यांच्यासह इतर कलाकारही चित्रपटात दिसले होते.