जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांच्या विवाहाला ४० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या लग्नाची कथा अत्यंत अनोखी अशी आहे. विशेषतः याचे कारण म्हणजे हे लग्न मध्यरात्री झाले होते. जावेद अख्तर यांच्या जवळच्या मित्रांनी या अनोख्या लग्नाची कहाणी सांगितली आहे. अभिनेता अन्नू कपूर यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्या रात्री जावेद अख्तर मद्याच्या नशेत होते आणि विवाहाच्या सर्व तयारीची जबाबदारी अन्नू कपूर यांच्यावर आली होती.

अन्नू कपूर यांनी आठवण सांगितली की, १९८४ च्या त्या रात्री ते जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्याबरोबर बसले होते. त्या वेळी अन्नू कपूर यांनी शबाना यांना विचारले, “तुम्ही दोघे लग्न का करीत नाही?” त्यावेळी शबाना या प्रश्नाचे थेट उत्तर देऊ शकल्या नाहीत. कारण- जावेद अख्तर त्यावेळी लग्नासाठी तयार नव्हते. अन्नू कपूर म्हणाले, “मी शबाना यांना म्हटलं, ‘आता एकदाचा निर्णय घ्या, लग्न करा.’ जावेद पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होते आणि शबाना संकोचत होत्या; त्या म्हणाल्या, ‘मी कसा निर्णय घेऊ शकते? कारण- जावेद अजून निर्णय घेण्यासाठी तयार नाहीत.”

हेही वाचा…“तुम्ही खूप खालचा स्तर…,” नसीरुद्दीन शाह यांनी दिवंगत वडिलांचा अपमान केल्यावर भडकलेली ट्विंकल खन्ना

दोघेही कुठल्याही ठराविक निर्णयावर येत नसल्याचं पाहून, अन्नू कपूर यांनी जावेद अख्तर यांना लग्नासाठी तयार केलं. जावेद मद्याच्या नशेत असतानाही अन्नू कपूर यांच्या आग्रहामुळे ते तयार झाले. त्यानंतर अन्नू कपूर यांनी स्वतःची कार घेतली आणि वांद्रे येथील मशिदीत जाऊन मौलवींशी लग्नाबाबत चर्चा केली. त्यांनी शबाना आझमी यांची आई आणि काही मित्रांना या विवाह सोहळ्यासाठी बोलावले. बोनी कपूरही या खास सोहळ्याचा भाग झाले होते.

शबाना आझमी यांच्याआधी जावेद अख्तर यांनी हनी इराणी यांच्याशी विवाह केला होता आणि त्यांना जोया अख्तर व फरहान अख्तर अशी दोन अपत्ये आहेत. मात्र, काही कारणांमुळे जावेद व हनी यांच्यात तणाव निर्माण झाला आणि त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शबाना आझमी यांच्याबरोबर त्यांचे प्रेम बहरले.

हेही वाचा…कपूर कुटुंबातील पहिला पण विस्मृतीत गेलेला स्टार, दिले होते अनेक हिट सिनेमे

जावेद अख्तर यांचे मद्याचे व्यसन

एकदा मुलाखतीत जावेद अख्तर यांनी स्वतः मान्य केले होते की, त्यांना मद्याचे व्यसन लागले होते आणि ते रोज एक बाटली मद्य पीत असत. मात्र, एक दिवस त्यांना जाणवले की, या व्यसनामुळे त्यांचे आयुष्य धोक्यात येत आहे. त्यानंतर त्यांनी मद्य सोडण्याचा निर्णय घेतला. शबाना आझमी यांनीही त्या काळाची आठवण सांगताना जावेद यांच्या मद्याच्या व्यसनावर वक्तव्य केले होते. त्या म्हणाल्या, “तो काळ आमच्यासाठी अत्यंत आव्हानात्मक होता.”