अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्याला मुलांसह रात्री घरात येऊ दिलं नाही, असा आरोप त्याची पत्नी आलियाने व्हिडीओ शेअर करत केला होता. मुलांबरोबर पोलीस स्टेशनला गेले आणि परत घरी आल्यावर सुरक्षा रक्षकांनी आत जाऊ दिलं नाही. मध्यरात्री रस्त्यावर थांबावं लागलं, असा आरोप करत आलिया सिद्दीकीने व्हिडीओ शेअर केले होते. त्या दिवशीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये सिक्युरिटी स्टाफ आलिया सिद्दीकीशी बोलताना दिसत आहे. त्यात मुलांना घरात येण्यास मनाई करण्यात आलेली नाही, असं स्टाफ म्हणताना दिसत आहे. तर, दुसरीकडे मुलांसह आपल्याला घरात जाऊ देत नसल्याचं आलिया म्हणताना दिसते. त्यावर सिक्युरिटी स्टाफ मुलांना परवानगी असल्याचं सांगते. ‘नवाजुद्दीन सिद्दीकींच्या आईला आलियाशी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे त्यांनी तिला घरात न येऊ देण्यास सांगितलंय, पण मुलं घरात येऊ शकतात,’ असं स्टाफ म्हणते.
या घराची मालकीण नवाजुद्दीन सिद्दीकी यांची आई असल्याचं स्टाफ म्हणते. तर, घर नवाजुद्दीन सिद्दीकीच्या नावे असल्याचा दावा आलिया करते. ‘नवाजुद्दीन सिद्दीकींचं हे घर असून ते माझे पती आहेत व माझ्या मुलांचे वडील आहेत,’ असं आलिया म्हणते. दरम्यान, हे घर नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आईच्या नावावर आहे आणि त्या मनाई करत असल्याचं स्टाफने सांगितलं. यानंतर ‘मुलांना नाही तर फक्त मला आत येण्यास मनाई करण्यात आली आहे. माझ्या अकाउंटमध्ये फक्त ८१ रुपये आहेत’, असं म्हणताना आलिया दिसते.
दरम्यान, आलिया सिद्दीकीने केलेले सर्व आरोप नवाजुद्दीन सिद्दीकीने फेटाळून लावले होते. आलियाला मुंबईत फ्लॅट घेऊन दिल्याचा खुलासाही नवाजने केला होता. पण ते घर आलियाने भाड्याने दिल्याचं त्याने म्हटलं होतं. आलिया फक्त पैशांसाठी या सर्व गोष्टी करत असल्याचा दावा नवाजुद्दीनने केला होता.