१९९० साली आलेला ‘आशिकी’ चित्रपट आणि त्यातील गाणी आजही लोकांना आठवतात. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता आणि अभिनेत्री अनु अग्रवालला या चित्रपटामुळे खूप लोकप्रियता मिळाली होती. पण त्यानंतर काही वर्षांनी अभिनेत्रीचा अपघात झाला आणि तिचा चेहरा बिघडला. अपघातात झालेल्या दुखापतीतून ठिक व्हायला तिला खूप वेळ लागला. परिणामी ती चित्रपटसृष्टीपासून दूर गेली.
१९९९ मध्ये अनूचा अपघात झाला आणि ती कोमामध्ये गेली. अपघातापूर्वी ती एका आश्रमात राहायची. त्यानंतर २००१ साली तिने संन्यास घेतला आणि टक्कल करण्याचा निर्णय घेतला होता. ती साधूप्रमाणे जीवन जगायची आणि आश्रमात राहायची. दरम्यान, अलीकडेच तिने चित्रपटांमध्ये पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ती सोशल मीडियावरही सक्रिय झाली आहे. तसेच काही कार्यक्रमांनाही ती हजेरी लावत असते. अशातच आता तिच्या बॉलिवूडमधील पुनरागमनाबद्दल मोठी माहिती समोर येत आहे.
अभिनेत्री अनू अग्रवाल लवकरच मोठ्या पडद्यावर दिसू शकते. अभिनेत्रीने स्वतःच याचा खुलासा केलाय. पुनरागमन करण्याबद्दल अनु अग्रवालने ‘बॉलिवूड लाईफ’शी खास बातचीत केली. यावेळी जेव्हा अनू अग्रवालला विचारण्यात आले की तू ‘आशिकी’ फ्रँचायझीच्या ‘आशिकी ३’चा भाग असशील का? यावर उत्तर देताना अभिनेत्री आधी हसली व नंतर म्हणाली, “अजून काहीही कन्फर्म झालेलं नाही. एकदा सर्व काही ठरल्यावर मी नक्कीच याबद्दल सांगेल. लवकरच तुम्हाला माझ्या बॉलिवूडमध्ये पुनरागमनाची चांगली बातमी ऐकायला मिळेल,” असंही तिने सांगितलं.
दरम्यान, १९९० मध्ये रिलीज झालेल्या ‘आशिकी’ चित्रपटात अनू अग्रवाल आणि राहुल रॉय मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर २०१३ साली आशिकी फ्रँचायझीचा दुसरा भाग ‘आशिकी २’ आला. त्या चित्रपटात आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपटही सुपरहिट ठरला होता. त्यानंतर निर्मात्यांनी याच्या तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे. ‘आशिकी ३’ चित्रपटासाठी अभिनेता कार्तिक आर्यनला साईन करण्यात आलंय. पण या चित्रपटात कोणती अभिनेत्री दिसणार, याबद्दल निर्मात्यांनी माहिती दिलेली नाही. अशातच या चित्रपटात अनू अग्रवाल दिसू शकते, असं अभिनेत्रीच्या वक्तव्यावरून दिसतंय.