२००४ साली शाहरुख खान, सुनील शेट्टी आणि सुश्मिता सेन यांचा ‘मैं हूं ना’ हा चित्रपट चांगलाच गाजला. यात झायेद खान, अमृता राव, सतीश शाह, किरण खेर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. हलकी फुलकी कॉमेडी, ड्रामा, देशभक्ती आणि जबरदस्त अॅक्शननी परिपूर्ण असा हा चित्रपट लोकांच्या चांगलाच पसंतीस पडला. याबरोबरच चित्रपटातील गाणीही प्रचंड हीट ठरली. यातीलच ‘तुमसे मिलके दिल का हाल’ ही कव्वालीही गाजली. या कव्वालीमध्ये वापरलेल्या एका शब्दामुळे गीतकार जावेद अख्तर यांनी याच्या लिखाणाच्या प्रक्रियेतून बाहेर पडायचा निर्णय घेतला होता.
संगीतकार अनु मलिक यांनी या चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली होती. आजही लोकांना यातील गाणी अक्षरशः तोंडपाठ आहेत. खासकरून यातील ही कव्वाली प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. याच कव्वालीदरम्यानचा एक किस्सा नुकताच अनु मलिक यांनी सांगितला आहे. या गाण्यात अनु मलिक यांनी वापरलेल्या एका शब्दामुळे जावेद अख्तर यांनी यातून बाहेर पडायचं ठरवलं होतं.
आणखी वाचा : ‘संदेसे आते है’ या गाण्यानंतर जावेद अख्तर यांनी मागितलेली अनु मलिक यांची स्वाक्षरी; नेमका किस्सा जाणून घ्या
एएनआयशी संवाद साधतांना अनु मलिक म्हणाले, “गाण्यातील ‘चेक दॅट, लाइक दॅट हे शब्द जावेद अख्तर यांना अजिबात पटले नव्हते. असे शब्द कोणत्या कव्वालीमध्ये असतात का? असं म्हणत जावेद साहेबांनी यातून काढता पाय घेतला होता.” यानंतर फराह खानने मध्यस्थी करून जावेद अख्तर यांची समजूत काढली होती.
फराह खान त्यांना म्हणाली की तिला पठडीतील कव्वाली या चित्रपटात अपेक्षितच नाही, तिला या चित्रपटासाठी एक फंकी कव्वाली हवी असल्याचं तीन जावेद अख्तर यांना सांगितलं होतं. बऱ्याच कष्टानंतर जावेद अख्तर यांचं मॅन वळवण्यात त्यांना यश आलं होतं. अनु मलिक या गाण्याबद्दल म्हणाले, “प्रत्येक कव्वालीची एक विशिष्ट शैली असते, अंदाज असतो. जावेद साहेबांनी ती कव्वाली उत्तमरित्या लिहिली. मी, सोनू निगम आणि इतर कव्वाल लोकांच्या सहाय्याने आम्ही ती तितक्याच ताकदीने सादरही केली.”