मनोरंजनसृष्टीतील कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांतील भूमिकामुळे, सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे, तर कधी हे कलाकार मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांचा भाग बनतात. आता दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी माशाबल इंडिया(Mashable India)ला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी मनोज बाजपेयी(Manoj Bajpayee)आणि त्यांच्याजवळ फक्त दोन पोळी बनण्याइतकेच पीठ होते, असे वक्तव्य केले आहे. याबरोबरच जे अभिनय क्षेत्रात येऊ इच्छितात, त्यांना काय करण्याची गरज आहे, याबद्दलदेखील वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले अनुभव सिन्हा?

अनुभव सिन्हा म्हणतात, “कलाकारांना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी एका संधीची गरज असते. पण त्यासाठी तुम्ही तयारी करत आहात का? ज्याच्यांकडे तर्कशुद्ध पद्धतीने विचार करण्याची ताकद नसते, ते कधीही चांगले कलाकार होऊ शकत नाहीत. जर तुम्ही कविता वाचत नसाल, तुम्हाला तुमचा इतिहास माहित नसेल किंवा तुमच्या सभोतली होणाऱ्या राजकीय घटना माहित नसतील तर तुम्ही स्वत:ला चांगला कलाकार म्हणू शकत नाही. तुम्हाला शिक्षित व्हावे लागेल.

पुढे बोलताना ते म्हणतात, “शिक्षित याचा अर्थ फक्त डिग्री मिळवणे नाही तर तुम्हाला तुमच्या देशाविषयी, समाजाविषयी, आयुष्याविषयी माहिती असायला पाहिजे.”

याच मुलाखतीत मनोज बाजपेयींविषयी बोलताना त्यांनी म्हटले, “मी त्याला १९८९पासून ओळखतो. जेव्हा आमच्याकडे फक्त दोन पोळी बनवण्याइतकेच पीठ असायचे, तेव्हापासून मी त्याला ओळखतो. नुकताच ‘आय सी ८१४: कंदाहार हायजॅक’ पाहिल्यानंतर त्याचा मला फोन आला होता आणि तो खूप आनंदाने बोलत होता. एकदा त्याने मला रात्री फोन करून सांगितले की त्याला माझा अभिमान वाटतो. त्याने त्याचा आनंद व्यक्त केला. पुन्हा सकाळी उठून त्याने मला फोन करून पुन्हा आनंद व्यक्त केला. तो माझ्या आयुष्यातील महत्वाचा व्यक्ती आहे, मात्र अद्याप मी त्याच्याबरोबर काम करू शकलो नाही.”

हेही वाचा: Coldplay Ticket : तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणी बुक माय शोच्या सीईओंना दोनवेळा नोटीस; पण हजर झाले दुसरेच अधिकारी!

पुढे त्यांनी म्हटले, “मी फक्त मनोज बाजपेयीचा मित्र नाही त्याचा मोठा चाहता देखील आहे. त्याचे कोणतेही काम पाहिले की मी त्याला ओळखतो याचा मला अभिमान वाटतो. तो असा अभिनेता आहे, ज्याच्याबरोबर प्रत्येक चित्रपटात काम करावेसे वाटते. एवढ्या काळापासून मैत्री असूनदेखील आम्ही एकत्र काम केले नाही. त्याने माझ्या चित्रपटात काम केले नाही. मला त्याचे लॉजिक माहित आहे आणि मी त्याचा आदरदेखील करतो. मी त्याला भीड चित्रपटासाठी विचारलेदेखील होते, पण तसे काही होऊ शकले नाही.”

दरम्यान, अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘आय सी ८१४: कंदाहार हायजॅक’ ही वेबसीरीज नेटफ्लिक्सवर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाली आहे. यामधील दहशतवाद्यांची नावे बदलल्यामुळे या वेबसीरीजवर मोठी टीका झाल्याचे पाहायला मिळाले होते.