ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर व प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांच्यात पत्रकार वीर संघवी यांनी २०१९ मध्ये आलेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ चित्रपटावर टीका केल्यानंतर X (पूर्वीचे ट्विटर)वर तीव्र वाद रंगला. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळावर बेतलेला हा चित्रपट सिंग यांचे माजी मीडिया सल्लागार संजय बारू यांच्या पुस्तकावर आधारित होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पत्रकार वीर संघवी यांनी ट्वीटमध्ये लिहिले, “जर तुम्हाला मनमोहन सिंग यांच्याबाबत पसरवलेल्या खोट्या गोष्टी आठवायच्या असतील, तर तुम्ही ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ पुन्हा पाहायला हवा. हा चित्रपट हिंदी चित्रपटांपैकी सर्वांत वाईट चित्रपटांपैकी एक आहेच, यासह माध्यमांचा उपयोग करून एका चांगल्या माणसाचे नाव खराब कसे करावे याचे ते उदाहरण आहे.”

हेही वाचा…Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…

हंसल मेहता यांनी संघवी यांच्या ट्वीटला पाठिंबा दर्शवीत “+100” असे ट्वीट केले. मात्र, हा पाठिंबा अनुपम खेर यांना खटकला. खेर यांनी हंसल मेहता यांना जोरदार प्रत्युत्तर देत त्यांना ढोंगी म्हणत टीका केली. त्यांनी लिहिले, “या चर्चेत वीर संघवी ढोंगी नाहीत. त्यांना चित्रपट आवडला नाही, हे सांगण्याचा त्यांना अधिकार आहे. पण, हंसल मेहता हे ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ चे क्रिएटिव्ह डायरेक्टर होते. ते इंग्लंडमध्ये चित्रपटाच्या संपूर्ण शूटिंगदरम्यान हजर होते. त्यांनी चित्रपटाला क्रिएटिव्ह इनपुट्स दिले आणि या कामासाठी मानधनही घेतलं असेल. त्यामुळे त्यांनी वीर संघवी यांच्या विधानावर १०० टक्के सहमत असल्याचं म्हणणं म्हणजे ढोंगीपणाचा कळस आहे.”

अनुपम खेर यांनी पुढे लिहिले, “मी संघवी यांच्या मताशी सहमत नाही. पण प्रत्येक जण कधी कधी वाईट किंवा सरासरी काम करतो. मात्र, आपण आपलं काम स्वीकारलं पाहिजे. हंसल मेहता यांनी काही लोकांकडून कौतुक मिळविण्यासाठी असं वागत राहू नये. हंसल! मोठे व्हा! माझ्याकडे अजूनही तुमच्याबरोबरचे शूटचे सर्व फोटो आणि व्हिडीओ आहेत.”

हेही वाचा…“जेव्हा तुम्ही तरुण, देखणे असता पण तुमच्याकडे…”; प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाला…

हंसल मेहता यांनी दिले प्रत्युत्तर

“मिस्टर खेर मला मान्य आहे. हो, मी चूक केली. मी माझं काम त्या वेळी जशी परवानगी होती, तसं व्यावसायिकपणे केलं. तुम्ही हे नाकारू शकता का? पण त्यामुळे मला या चित्रपटाचं कायम समर्थन करावं लागेल, असं नाही.”

हंसल मेहता यांनी पुढे लिहिले, “मला हवं असल्यास तुम्ही मला नावं ठेवा. जर मी तुम्हाला दुखावलं असेल, तर क्षमा मागतो. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला ख्रिसमसच्या शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा! आपण कधीही भेटून या वादावर चर्चा करू.”

हेही वाचा…‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित

हंसल मेहता यांनी डॉ. मनमोहन सिंग यांचे अलीकडे निधन (वय ९२) झाल्यानंतर, त्यांच्या चित्रपटातील चुकीच्या चित्रणाबद्दल खेद व्यक्त केला. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले, “देशाने त्यांच्याबरोबर अन्याय केला आहे. त्यापेक्षा जास्त मी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी अन्याय केला आहे. मी त्यांचं असं चित्रण केल्याचा पश्चात्ताप मला आयुष्यभर राहील. क्षमस्व सर! तुम्ही एक सन्माननीय व्यक्ती होता— अर्थशास्त्रज्ञ, वित्तमंत्री व पंतप्रधान म्हणून तुमच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anupam kher and hansal mehta dispute over the accidental prime minister criticism psg