आजवर ५०० हुन अधिक चित्रपटांमध्ये काम करणारे अनुपम खेर हे आज त्यांचा ६९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. मूळचे ते हिमाचल प्रदेशचे असून त्यांनी करियर करण्यासाठी मुंबई गाठली. एनएसडीसारख्या संस्थेतून त्यांनी अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. आजवरच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. ते बॉलिवूडमधील एक ज्येष्ठ आणि नावाजलेले अभिनेते आहेत. सध्या अनुपम हे वेगवेगळ्या चित्रपटांमधून लोकांच्या समोर येत आहेत.
अभिनयाबरोबरच अनुपम खेर यांनी दिग्दर्शनातही नशीब आजमावलं होतं. ‘ओम जय जगदिश’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुपम खेर यांनी केलं होतं, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. त्यानंतर अनुपम खेर यांनी दिग्दर्शनाचा विचार कधीच केला नाही. पण आता लवकरच ते पुन्हा दिग्दर्शक म्हणून कमबॅक करणार आहेत. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे ज्याचे दिग्दर्शन ते स्वतः करणार आहेत.
आपल्या वाढदिवसाचं निमित्त साधत अनुपम खेर यांनी त्यांच्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ही घोषणा करताना त्यांनी सर्वप्रथम आपल्या आईचे आशीर्वाद घेतले आणि हा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना अनुपम खेर यांनी लिहिलं, “माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधत मला ज्या चित्रपटाचे दिग्दर्शन करायचे आहे त्याची घोषणा मी आज करत आहे. याचे नाव आहे ‘तन्वी द ग्रेट’. काही कथा या लोकांपर्यंत पोहोचल्याच पाहिजेत, अन् माझ्या डोक्यात विचार आला की माझ्या आईच्या, देवाच्या अन् वडिलांच्या आशीर्वादानेच याची सुरुवात व्हायला हवी. या म्युझिकल चित्रपटावर मी गेले तीन वर्ष काम करत आहे. अखेर उद्या महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर मी या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु करत आहे. वाढदिवशी स्वतःला नवीन आव्हान देण्याची मजा काही औरच आहे. तुम्हा सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी असूद्यात.”
अनुपम खेर ही गेल्यावर्षी विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मिर फाइल्स’ या चित्रपटात झळकले. यातील त्यांची भूमिका आणि त्यांच्या अभिनयाची भरपूर प्रशंसा झाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाईदेखील केली. त्यानंतर अनुपम यांचा अमिताभ बच्चन आणि बोमन इराणीबरोबरचा ‘ऊंचाई’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, प्रेक्षकांनी या चित्रपटालाही उदंड प्रतिसाद दिला आहे. आता त्यांच्या दिग्दर्शनातील कमबॅकची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.