यावर्षी बॉलिवूडमध्ये ‘द काश्मिर फाइल्स’ आणि दाक्षिणात्य चित्रपटांपैकी ‘कांतारा’ या दोनही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केली. अगदी कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटांनी ३०० आणि ४०० कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटातील कलाकार अनुपम खेर आणि रिषभ शेट्टी यांनी नुकतीच ‘टाईम्स नाऊ समिट २०२२’ या कार्यक्रमात हजेरी लावली आणि चित्रपटसृष्टीतील बदलाबद्दल मनमोकळेपणे संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुप्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी या मंचावर या दोघांची मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान चित्रपट व्यवसाय आणि त्याची आर्थिक गणितं याविषयी प्रश्न विचारला गेला. गेल्या काही महिन्यात ४०० आणि ५०० कोटी बजेट असलेले चित्रपट दणकून आपटले आणि केवळ १६ आणि १७ कोटीमध्ये बनलेल्या या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बाजी मारली. याविषयी चेतन भगत यांनी अनुपम खेर यांना आणि अप्रत्यक्षरित्या बॉलिवूडला एक सवाल केला. तो म्हणजे जे दाक्षिणात्य चित्रपटांना जमतं ते आपल्याला का जमत नाही?

आणखी वाचा : “मी लग्नगाठ…” आमिर खानच्या लेकीच्या साखरपुड्यानंतर ‘दंगल’ फेम अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष

यावर उत्तर देताना अनुपम खेर म्हणाले, “कार्तिक आर्यनचा ‘भूलभुलैया २’ सुपरहीट ठरला, संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपटही चांगला चालला, त्यामुळे मोठ्या बजेटचे चित्रपट चालत नाहीत असं नाहीये. हिंदी चित्रपटातील दिखावा आता लोकांना नकोय, आता लोकांकडे करमणुकीची बरीच साधनं उपलब्ध आहेत. त्यामुळे जी गोष्ट लोकांना खोटी, बेगडी वाटतीये ती लोक स्वीकारायला तयार नाहीत. त्यामुळेच प्रेक्षक या अशा चित्रपटांपेक्षा ‘कांतारा’ आणि ‘आरआरआर’सारखे चित्रपट पाहणं पसंत करत आहे, पण मला असं वाटतं की हासुद्धा काळ जाईल, यातूनही बऱ्याच गोष्टी आपण शिकून येणाऱ्या काळात आपण अधिक वेगळे आणि उत्तम चित्रपट बनवू.”

अनुपम खेर यांनी त्यांच्या ३८ वर्षांच्या कारकिर्दीत ५३२ चित्रपटात काम केलं आहे आणि अजूनही ते या क्षेत्रात सक्रिय आहेत. ‘द काश्मिर फाईल्स’मधील त्यांची भूमिका लोकांना भावली आणि तिचं कौतुकही झालं. याबरोबरच त्यांनी ‘कार्तिकेय २’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका केली. नुकताच त्यांचा अमिताभ बच्चन आणि बोमन इराणी यांच्याबरोबरचा ‘उंचाई’ हा सुरज बडजात्या दिग्दर्शित चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटालाही लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anupam kher explains why regional films doing more business than hindi films at times now summit 2022 avn