मार्च २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटामध्ये अनुपम खेर यांनी पुष्कर नाथ पंडित हे महत्त्वपूर्ण पात्र साकारले होते. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली, त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक झाले. चित्रपटामध्ये अभिनयाद्वारे त्यांनी काश्मिरी पंडितांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. २०१९ मध्ये त्यांचा ‘द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर त्यांनी काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. येत्या शुक्रवारी त्यांचा ‘ऊंचाई’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

राजश्री फिल्म्सच्या सूरज बरजात्या यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ऊंचाई’ या चित्रपटामध्ये अनुपम खेर यांच्यासह अमिताभ बच्चन, बोमन इराणी आणि डॅनी डॅन्झोपा हे कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत. नीना गुप्ता, सारिका आणि परिणिती चोप्रा यांनी या चित्रपटात सहाय्यक व्यक्तिरेखा साकारणार आहेत. सूरज यांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये चित्रपटातील प्रमुख कलाकार उपस्थित होते. तेथे गप्पा मारताना अनुपम यांनी बोमन इराणी हा चित्रपट करण्यास राजी नसल्याचे सांगितले.

आणखी वाचा – ‘बिग बॉस’च्या घरात तुफान राडा, अर्चना गौतमने गळा दाबल्यानंतर शिव ठाकरेच होतोय ट्रोल, नेमकं प्रकरण काय?

किस्सा सांगताना ते म्हणाले, “मी त्याला (बोमन) फोन केला आणि म्हणालो, ‘तू वेडा झाला आहेस का, हा चित्रपट तू का करत नाहीयेस?’ हा चित्रपट माझ्या कारकीर्दीतल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. पुढे काही दिवसांनी त्याने चित्रपटामध्ये काम करायला होकार दिला.” यावर बोलताना बोमन इराणी यांनी “त्यावेळी मी काही वैयक्तिक कारणांमुळे चित्रपट करायला लगेच होकार देऊ शकत नव्हतो”, असे स्पष्टीकरण दिले.

आणखी वाचा – “करोना महामारीमुळे बॉलिवूड माफिया…” प्रकाश राज यांनी सांगितली हिंदी चित्रपटसृष्टीची दुसरी बाजू

सूरज बरजात्या यांनी फार मोजके चित्रपट तयार केले आहेत. कुटुंबव्यवस्था हा मुद्दा त्यांच्या बहुतांश चित्रपटाचा गाभा असल्याचे प्रकर्षाने लक्षात येते. २०१५ मध्ये त्यांचा ‘प्रेम रतन धन पायो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता तब्बल सात वर्षांनंतर त्यांचा ‘ऊंचाई’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.