अनुपम खेर हे चार दशकांहून अधिक काळ आपल्या कारकिर्दीत विविध भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये विविध पात्रांची भूमिका साकारली आहे. मात्र, त्यांनी साकारलेल्या वडिलांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत. यामध्ये शाहरुख खानबरोबर ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, दिवंगत सुशांत सिंग राजपूतसह ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’, आणि राणी मुखर्जी समवेत ‘कुछ कुछ होता है’मध्ये त्यांनी वडिलांची भूमिका केली आहे. अनुपम खेर यांनी बॉलीवूडमध्ये बाप म्हणून विविध भूमिका साकारल्या आहेत. मात्र, खऱ्या आयुष्यात अनुपम खेर यांना स्वतःचं मूल नसल्याची खंत जाणवते.

अनुपम खेर यांनी १९८५ मध्ये अभिनेत्री किरण खेर यांच्याशी दुसरं लग्न केलं. त्यांनी किरण खेर यांच्या पहिल्या पतीचा मुलगा सिकंदर याला आपला मुलगा मानलं.

हेही वाचा…नीतू कपूर यांनी सांगितला ऋषी कपूर यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीत काम करण्याचा अनुभव; म्हणाल्या, “मी थरथरत…”

स्वतःचं मूल असतं तर…

शुभंकर मिश्रा यांना दिलेल्या एका मुलाखतीत अनुपम खेर यांना विचारलं गेलं की, त्यांना स्वतःचं मूल नसल्याची खंत आहे का? यावर त्यांनी लगेच उत्तर दिलं, “पूर्वी मला असं फारसं वाटलं नाही, पण आता कधी कधी असं वाटतं. मला गेल्या सात-आठ वर्षांपासून हे जाणवतंय. असं नाही की, मी सिकंदरबरोबर आनंदी नाही; पण मला वाटतं मुलांना वाढताना पाहणं, त्यांच्याशी एक बंध तयार करणं यात एक वेगळाच आनंद आहे. मी तुमच्याशी प्रामाणिकपणे बोलतोय. मी हा प्रश्न टाळू शकलो असतो, पण असं न करता मी उत्तर देतोय. मात्र, हे माझ्या जीवनातलं काही मोठं दु:ख नाही. पण, कधी कधी असं वाटतं की, स्वतःचं मूल असतं तर बरं झालं असतं.”

अनुपम खेर पुढे म्हणाले, “आत्तापर्यंत मी कामात खूप व्यस्त होतो, पण ५० ते ५५ वयाच्या नंतर हा रिकामा वेळ जाणवू लागला. याचं मुख्य कारण म्हणजे किरणही कामात व्यस्त झाली आणि सिकंदरही. मी माझ्या संस्थेत मुलांबरोबर काम करतो: ‘द अनुपम खेर फाउंडेशन.’ या संस्थेच्या माध्यमातून आम्ही मुलांसाठी बरीच कामं करतो. कधी कधी माझ्या मित्रांच्या मुलांना पाहून आपलं मूल असायला हवं होतं असं वाटतं, पण तरीही यामुळे माझ्या जीवनात काही कमी नाही.”

हेही वाचा…एकेकाळी ज्याच्याशी मोडला साखरपुडा, आता त्यालाच डेट करतेय सोहेल खानची एक्स बायको, कोण आहे सीमा सजदेहचा बॉयफ्रेंड?

पूर्वी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर यांनी सांगितलं होतं की, जेव्हा सिकंदर त्यांच्या आयुष्यात आला तेव्हा तो चार वर्षांचा होता. “माझे वडील माझ्यासाठी जे होते, जशी वागणूक त्यांनी मला दिली तशीच वागणूक मी सिकंदरला दिली. पण, तरीही मला स्वतःचं मूल नसल्याची खंत नाही असं म्हणणं खोटं ठरेल,” असं अनुपम खेर यांनी स्पष्ट केलं होतं.

हेही वाचा…“त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात…”, शबाना आझमींनी सांगितली ‘अर्थ’ चित्रपटावेळची दिग्दर्शकाची आठवण; महेश भट्ट म्हणालेले, “मृत्यू जवळ अनुभवण्यासारखं…”

‘लेहरें’च्या वृत्तानुसार, अनुपम आणि किरण यांनी मूल होण्यासाठी प्रयत्न केले होते , पण वैद्यकीय मदत घेऊनही काही साध्य झालं नाही. अनुपम यांचं पहिलं लग्न अभिनेत्री मधुमती कपूर यांच्याशी झालं होतं, तर किरण यांचं पूर्वी गौतम बेरी यांच्याशी लग्न झालं होतं.