अभिनेते अनुपम खेर हे त्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चांगले चर्चेत असतात. सोशल मीडियावर सक्रिय राहत विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर ते बेधडकपणे आपली मत मांडताना दिसतात. ते नेहमीच त्यांच्या आयुष्याबद्दल खुलेपणाने व्यक्त होतात. गेल्या अनेक वर्षात अनेक सुपरहिट चित्रपट देऊनसुद्धा आजही अनुपम खेर हे भाड्याच्याच घरात राहतात. यामागील कारण नुकतंच त्यांनी स्पष्ट केलं.
अनुपम खेर यांनी नुकतीच ‘टाईम्स नाऊ समिट २०२२’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी त्यांच्या करिअरमधील अनेक महत्वाच्या घडामोडी सांगितल्या, त्यांना आलेले अनुभव प्रेक्षकांशी शेअर केले. त्यासोबतच त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही काही गोष्टी उलगडल्या. या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलं, “तुमच्यासाठी पैसा म्हणजे काय?” यावर अनपम खेर यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचंच लक्ष वेधलं.
आणखी वाचा : शरीरावर जखमा, शर्टवर रक्त…रणबीर कपूरचे फोटो पाहून चाहते काळजीत
अनुपम खेर म्हणाले, “मी अत्यंत गरीब कुटुंबातून आलो आहे. जेव्हा माझ्याकडे काहीच काम नव्हतं तेव्हा पैसा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. तेव्हा आमच्या कुटुंबाने शंभर वर्षात दहा हजार रुपयेही एकत्र पाहिले नव्हते. त्यावेळी ‘जवानी’ या चित्रपटासाठी मला रमेश बहल यांनी दहा हजार रुपये रोख रक्कम दिली होती. ते दहा हजार रूपये पाहून मी जितका आनंदी झालो होतो तितका दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमुळे आतापर्यंत मी आनंदी झालो नाही.”
पुढे ते म्हणाले, “सात-आठ वर्षांपूर्वी मला जाणवलं की आपल्या आयुष्यात पैसा म्हणजेच सर्व काही असं नसतं. तेव्हा मी ठरवलं की कधीही आपलं स्वतःचं घर घ्यायचं नाही. म्हणून मी आजही भाड्याच्या घरात राहतो. यामुळे मला खूप आनंद आणि मुक्तपणे जगायला मिळतं. स्वतःच्या मेहनतीने खरेदी केलेली गाडी हवी, पण त्याव्यतिरिक्त कमावलेल्या पैशांचं तुम्ही काय करणार? मी खूप मेहनत करतोय तर मी हक्काने सांगू शकतो की माझा हा चित्रपट चांगला चालला, त्यामुळे आता माझं मानधन इतकं असणार. स्वकष्टाचा पैसा तुम्हाला आत्मविश्वास, स्वतःच्या कष्टाने पैसे कमावल्याचं समाधान आणि आनंद देतो. पण जे तुम्ही कमावलेलंच नाही त्याचा तुमच्या आयुष्यात काहीही उपयोग नाही.”
हेही वाचा : अनुपम खेर यांना ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पाहून नेटकरी नाराज; म्हणाले, “‘द काश्मीर फाईल्स’च्या वेळी…”
मार्च २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटामध्ये अनुपम खेर यांनी पुष्कर नाथ पंडित हे महत्त्वपूर्ण पात्र साकारले होते. तर नुकताच प्रदर्शित झालेला अनुपम खेर यांचा ‘ऊंचाई’ या चित्रपटालाही प्रेक्षक खूप चांगला प्रतिसाद देत आहेत.