अभिनेता अनुपम खेर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे निस्सीम चाहते होते. एका अलीकडच्या मुलाखतीत त्यांनी दिलीप कुमार यांच्याबरोबर १९८६ च्या ‘कर्मा’ या चित्रपटात काम करण्याचा अनुभव सांगितला. या चित्रपटात अनुपम खलनायकाच्या भूमिकेत होते. त्यांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा दिलीप कुमार यांना सेटवर पाहिले, तेव्हा ते इतके भारावले होते की, ते फक्त त्यांच्याकडे एकटक पाहतच राहिले. दिग्दर्शक सुभाष घई यांना अनुपम खेरना आठवण करून द्यावी लागली, “तू खलनायक आहेस; दिलीप कुमार यांचा चाहता नाही.”
“नाकातून रक्त वाहत असतानाही दिलीप कुमार साहेबांचा सिनेमा पाहिला”
‘रेडिओ नशा’ला दिलेल्या मुलाखतीत अनुपम यांनी आपल्या तरुणपणात घडलेली एक आठवण सांगितली. त्या काळात दिलीप कुमार यांच्या ‘गोपी’ चित्रपटाचे तिकीट मिळविण्याच्या नादात त्यांचा नाकाला दुखापत झाली होती. त्यांनी सांगितले, “त्यावेळी तिकीट खिडकी उघडायची, तेव्हा लोक दिलीप कुमार यांच्या चित्रपटाचं तिकीट मिळवण्यासाठी धावायला लागायचे. ‘गोपी’चं तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करताना, कोणीतरी मला ढकललं आणि कुणाच्या तरी पायाचा झटका माझ्या नाकावर बसला. त्यामुळे रक्त येत होतं. तरीही मी तो सिनेमा पाहिला आणि मला मोठ्या पडद्यावरचा तो अनुभव आवडला.”
कर्मादरम्यानचा ‘तो’ किस्सा
अनेक वर्षांनंतर जेव्हा अनुपम खेर यांना ‘कर्मा’मध्ये आपल्या आदर्शाबरोबर काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा ते पूर्णपणे अवाक झाले होते. मुलाखतीत त्यांनी दिलीप कुमार यांची काम करण्याची अनोखी पद्धत सांगितली आणि त्यांनी अनेकदा सीन पुढे ढकलल्याचं सांगितलं . “मी ‘अर्जुन’ चित्रपटाचं शूटिंग करीत होतो, जे सकाळी ५ वाजता संपलं. पण, तरीही मी मेकअप आणि खोटी दाढी लावून ‘कर्मा’च्या सेटवर थेट ७ वाजता आलो. दिलीपसाहेब जवळपास ११ वाजता आले. ते एक राजा होते, ते त्यांच्या स्वत:च्या शैलीत काम करायचे.”
अनुपम खेर यांनी पुढे सांगितल्यानुसार- पहिल्यांदा दिलीप कुमार यांच्याबरोबरच सीन त्यांना करायचा होता, ज्यामध्ये त्यांना दोन पानांचा संवाद म्हणायचा होता, तर दिलीप कुमार यांचं पात्र फक्त ऐकत आहे, असा तो सीन होता. अनुपम खूप चिंतेत होते आणि त्यांनी त्या डायलॉग्सचा वारंवार सराव केला होता; मात्र दिलीप कुमार यांनी तो सीन पुढे ढकलला.
हेही वाचा…ना सलमान, ना शाहरुख…; बॉलीवूडचा ‘हा’ अभिनेता आहे रणवीर सिंहचा ‘Man Crush’, स्वत: खुलासा करत म्हणाला…
अनुपम खेर दिलीपसाहेबांबरोबरचा सीन सांगताना म्हणाले, “जेव्हा ते सेटवर आले, त्यांनी चांदीच्या भांड्यात चहा घेतला आणि नाश्ता केला आणि मग म्हणाले, “आपण लंचनंतर काम करू.“ ते ३-४ वाजता परत आले आणि पुन्हा तो सीन त्यांनी पुढच्या दिवसावर ढकलला. या सगळ्यात मी फक्त त्यांच्याकडे पाहत होतो, पूर्णपणे मंत्रमुग्ध झालो होतो. सुभाषजींनी मला बाजूला घेऊन सांगितलं, ‘तू मला अडचणीत टाकणार आहेस. तू त्यांच्याकडे ज्या पद्धतीने पाहतोयस, ते पाहून असं वाटतंय की तू त्यांच्यावर प्रेम करतोयस. लक्षात ठेव, तू खलनायक आहेस!’ मी त्यांना शब्द दिला की, प्रत्यक्ष शूटिंगदरम्यान असं काहीच होणार नाही.”
“आणि दिलीपसाहेब म्हणाले, ‘ये पठाण का हाथ है’”
अनुपम यांनी दिलीप कुमार यांच्याबद्दलचा आणखी एक प्रसंग सांगितला. एकदा दिलीप कुमार यांना त्यांना जोरात चापट मारायला सांगितलं होतं. मात्र, दिलीप कुमार यांनी त्यांना तसं न करण्याचा इशारा दिला. “दिलीपसाहेब म्हणाले, ‘ये पठाण का हाथ है, तुझं तोंड वाकडं होईल.’” अनुपम यांनी सांगितलं की, दिलीप कुमार नेहमीच त्यांना प्रोत्साहन देत असत आणि त्यांनी एकदा मला सांगितलं होतं की, मी खूप पुढे जाईन.