आज २६/११ चा हल्ला होऊन १४ वर्ष झाली. २००८ साली २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शेकडो निष्पाप लोक मारले गेले. आजही ही घटना आठवल्यवर प्रत्येकजण हादरून जातो. या हल्ल्यावर आधारित बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट तयार झाले. त्या चित्रपटांमधून मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ला दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या चित्रपटांमध्ये ‘हॉटेल मुंबई’ हा चित्रपटही सामील आहे. या चित्रपटाबद्दल अनुपम खेर यांनी त्यांचा अनुभव सांगितला होता.
‘हॉटेल मुंबई’ हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला. अभिनेते अनुपम खेर यांचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका होती. या चित्रपटात अनुपम खेर यांनी ताज हॉटेलचे मुख्य आचारी हेमंत ओबेरॉय यांची भूमिका साकारली होती, ज्यांनी त्या रात्री ताज हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान अनेकांचे प्राण वाचवले होते. एका मुलाखतीदरम्यान अनुपम खेर म्हणाले होते की, या चित्रपटात काम करणं त्यांच्यासाठी अजिबात सोपं नव्हतं.
आणखी वाचा : अनुपम खेर भाड्याच्या घरात राहतात; मालकीचं घर सहज शक्य असूनही, कारण…
एका मुलाखतीदरम्यान या चित्रपटातील त्यांच्या पात्राबद्दल आणि २६/११ च्या भयानक आठवणींबद्दल बोलताना अनुपम खेर म्हणाले होते, “हे पात्र माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे पण तसंच ते साकरणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. इतरांच्या सुरक्षेसाठी आपल्या भीतीवर मात करणाऱ्या माणसाची भूमिका साकारणं हा माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव होता. त्या दिवशी हॉटेलमध्ये काय झालं होतं याचा विचार केला की अजूनही माझा थरकाप उडतो.”
हेही वाचा : “माझी राजकीय विचारधारा ही…” अनुपम खेर यांनी मुलाखतीत केला खुलासा
‘हॉटेल मुंबई’चे दिग्दर्शन अँथनी मारस यांनी केले होते. या चित्रपटात अभिनेते देव पटेलही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. या चित्रपटाच्या कथेच्या मांडणीचं आणि सगळ्या कलाकारांच्या कामाचं प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.