ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांसह आणखी एका व्यक्तीला सर्वात मोठा धक्का बसला, ते आहेत अभिनेते अनुपम खेर. सतीश कौशिक व अनुपम खेर यांची जवळपास ४५ वर्षांची मैत्री होती. या दोघांच्या मैत्रीची खूप चर्चा असायची. मित्राच्या अचानक जाण्याने अनुपम खेर कोलमडले आहेत.
अनुपम खेर ट्वीट करत सर्वात आधी मित्राच्या निधनाची बातमी दिली होती. त्यानंतर मित्राच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांनी सतीश कौशिक यांच्याबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. “मृत्यू हा जीवनाचा शेवट आहे, नात्यांचा नाही.” असं कॅप्शन देत अनुपम खेर यांनी हा व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये ते सतीश कौशिक यांच्या डोक्याचा मसाज करताना दिसत आहेत.
Video: जेव्हा लेक वशिंकाबरोबर थिरकलेले सतीश कौशिक; ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावूक
व्हिडिओमध्ये सतीश कौशिक एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान खुर्चीवर बसले आहेत आणि अनुपम खेर त्यांच्या डोक्याला मालिश करत आहेत. अनुपम खेर म्हणतात, ‘निर्मात्याला खूश करण्यासाठी काय करावे लागेल ते पाहा. मालिश…तेल मालिश…मजा येतेय ना सर…’ त्यावर सतीश कौशिश म्हणतात, ‘अरे व्वा यार…अशाच एक्स्ट्रा डेट्स पण दे’, त्यावर अनुपम खेर म्हणतात, ‘सर इतर चित्रपटांसाठी ना…’ या व्हिडीओमध्ये दोघांची केमिस्ट्री आणि मैत्री पाहायला मिळते.
दरम्यान, अनुपम खेर सतीश कौशिक यांच्या अंत्यसंस्कारावेळी हमसून हमसून रडताना दिसले होते. त्यांचा हा व्हिडीओ पाहून नेटकरीही भावूक झाले होते. अनुपम खेर यांच्या व्हिडीओवर कमेंट करत चाहते त्यांच्याप्रती सांत्वना व्यक्त करत आहेत.