ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचं ९ मार्च रोजी निधन झालं. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे कुटुबीय, मित्र-परिवार व चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेते अनुपम खेर व सतीश कौशिक खूप जवळचे मित्र होते. अनुपम खेर यांनीच मित्राच्या निधनाची बातमी दिली होती. दोघांची तब्बल ४५ वर्षांची मैत्री होती, दोघेही एकमेकांना रोज न चुकता फोन करायचे. अशातच शुक्रवारी आपण सवयीप्रमाणे सतीश यांचा नंबर डायल करत होतो, असं अनुपम खेर यांनी एक व्हिडीओ शेअर करत सांगितलं.
Video: जेव्हा लेक वंशिकाबरोबर थिरकलेले सतीश कौशिक; ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावूक
अनुपम खेर म्हणाले, “मी तुमच्याशी बोलतोय कारण मला माझा मित्र सतीश कौशिकला गमावण्याचं खूप दु:ख आहे. मला खूप त्रास होतोय, कारण ४५ वर्षांची मैत्री खूप घनिष्ट असते. ती एक सवय असते. एक सवय जी तुम्हाला सोडायची नाही. तो गेल्यापासून…आज मी विचार करत होतो की कुठे जेवू, काय जेवू. मग मला विचार आला की सतीशला फोन करतो. मी फोन उचलला आणि नंबर डायल करणार होतो, इतक्यात मला आठवलं. माझ्यासाठी ही परिस्थिती खूप कठीण आहे, कारण ४५ वर्षे एखाद्या व्यक्तीबरोबर असण्याचा खूप मोठा कालावधी आहे. आम्ही दोघांनी एकत्र स्वप्नं पाहिली. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून आम्ही दोघांनी एकत्र आयुष्य सुरू केलं. जुलै १९७५ मध्ये. त्यानंतर आम्ही एकत्र बसायचो. तो डे स्कॉलर होता आणि मी हॉस्टलर होतो. मग त्याच्या खायचं, बसायचं. तो आधी मुंबईला आला, मी नंतर आलो. मग आम्ही खूप मेहनत केली, याठिकाणी पोहोचलो आणि यश मिळवलं.”
या फोटोत आहेत सतीश कौशिक अन् त्यांचे दोन जवळचे मित्र; तुम्ही ‘या’ कलाकारांना ओळखलंत का?
पुढे ते म्हणाले, “आम्ही दोघं एकमेकांचा हेवा करायचो, चिडायचो, भांडण करायचो, पण रोज सकाळी ८ ते साडेआठ वाजता एकमेकांना फोन करायचो. मला कालपासून कुठेच मन लागत नव्हतं, मग मी विचार केला की काय करू? मला पुढे जायचं आहे. माझे वडील गेल्यावर मी त्या आघातातून बाहेर पडलो, जेव्हा आपण एखाद्याला गमावतो किंवा कोणीतरी आपल्या आयुष्यातून निघून जातं तेव्हा आपल्याला त्यातून सावरत पुढे जावं लागतं. आयुष्यही आपल्याला हेच शिकवतं आणि हेच शिकायचं असतं. तेव्हा मी विचार केला की मी माझ्या मनात जे विचार करत आहे ते सर्व तुमच्याशी शेअर केले तर मला बरं वाटेल.” इतकं बोलतानाच अनुपम खेर यांचा कंठ दाटून आला आणि ते रडू लागले.
“मला आयुष्यात पुढे जायचं आहे. त्याला गमावणं मी कधीच विसरू शकणार नाही, पण मला आयुष्यात पुढे जायचं आहे कारण जीवन तर जगावं लागेल ना. म्हणून मी त्याला आनंद देणार्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. हे कठीण आहे, पण मित्रांनो, मी प्रयत्न करतो. त्याला खूप आनंद होईल. तो खूप चांगला होता. त्याच्यात खूप ताकद होती. तो मित्रांचा मित्र होता. आयुष्य चालत राहिलं पाहिजे. चला तर मग आयुष्याला पुढे नेऊ आणि मी हा चॅप्टर माझ्या मनात ठेवेन. मी सतीशला आनंदी करण्याचा प्रयत्न करेन, कारण त्याला मी आनंदी राहावं, अशीच त्याची इच्छा असेल. माझा प्रिय मित्र सतीश कौशिक, तू नेहमी माझ्या हृदयात राहशील,” असं अनुपम खेर म्हणाले.
दरम्यान, अनुपम खेर यांच्या या व्हिडीओवर बॉलिवूड सेलिब्रिटी व चाहते त्यांना या परिस्थितीतून सावरण्यास देव शक्ती देवो, अशा कमेंट्स करत आहेत. तर काही जण सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहत आहेत.