Anurag Kashyap Dance Video : प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे त्याच्या लाडक्या लेकीचं लग्न. काही दिवसांपासून अनुरागची लेक आलिया कश्यपच्या लग्नाआधीच्या विविध विधींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मेंदी आणि हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता अनुराग कश्यपचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
आलिया सध्या २३ वर्षांची आहे. गेल्या वर्षी २०२३ मध्ये तिनं बॉयफ्रेंड शेन ग्रेग्रोयरबरोबर साखरपुडा केला होता. त्यानंतर ११ डिसेंबरला सर्व कुटुंबीयांच्या साक्षीनं दोघांनी एकमेकांचा पती-पत्नी म्हणून स्वीकार केला आहे. हा विवाहसोहळा मुंबईच्या बॉम्बे क्लब, महालक्ष्मी रेसकोर्समध्ये पार पडला. या ठिकाणी नवरदेवाकडील पाहुण्यांचे स्वागत करताना अनुरागच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा : ‘झी मराठी’ची लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! ‘शेवटचा दिवस’ म्हणत कलाकारांनी शेअर केले सेटवरचे फोटो
व्हिडीओमध्ये अनुराग कश्यपनं लेकीच्या लग्नात आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं आहे. त्यात अनुराग ढोल-ताशाच्या तालावर नाचतोय. नवरदेव शेन ग्रेग्रोयरसुद्धा ढोल-ताशाच्या तालावर नाचताना दिसत आहे. अनुरागनं यावेळी स्मित करीत हातात फुलांचा हार घेऊन सर्व पाहुण्यांचं स्वागत केलं आहे. यावेळी त्यानं सुंदर पारंपरिक कपडे परिधान केले होते. तर नवरदेव शेन ग्रेग्रोयरनंदेखील सुंदर पारंपरिक पोशाख परिधान केला होता.
मेंदी सोहळ्यात झाला भावूक
सोशल मीडियावर सध्या आलियाच्या मेंदी सोहळ्यातील काही फोटो आणि व्हिडीओसुद्धा व्हायरल झालेत. आलियाची मेंदी कश्यप कुटुंबीयांनी सुंदर पद्धतीनं साजरी केली आहे. त्यातील एका व्हिडीओमध्ये अनुराग आणि त्याची लेक आलिया ढोल-ताशावर नाचत आहेत. त्यामध्ये अनुरागनं आलियाला मिठी मारलीय. तिला मिठी मारून, तो सुंदर डान्स करत आहे. व्हिडीओमध्ये डान्स करताना अनुराग लेकीला मिठी मारून भावूक झालेला दिसत आहे.
आणखी एका व्हिडीओत अनुराग पापराझींना मजेशीर उत्तर देताना दिसला आहे. एक फोटोग्राफर त्याला फोटोसाठी पोज दे, असं सांगतो. त्यावेळी अनुराग त्याला मस्करीमध्ये म्हणतो, “अरे यार, भान नाहीये मला गेल्या चार दिवसांपासून.”
हेही वाचा : नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
अमुरागची मुलगी आलिया कश्यप एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर विविध ब्रॅण्डचे प्रमोशन करताना दिसते. दोघांची भेट एका डेटिंग अॅपवर झाली होती. त्यानंतर शेन ग्रेग्रोयरनं बालीमध्ये आलिया कश्यपला प्रपोज केलं होतं. पुढे २०२३ मध्ये त्यांनी साखरपुडा केला आणि अधिकृतपणे ते लग्न करणार असल्याचं जाहीर केलं. आता त्यांच्या लग्नाचे सुंदर फोटो आणि व्हिडीओसुद्धा व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.