Anurag Kashyap Left Mumbai : हिंदी चित्रपटसृष्टीत मागील काही वर्षांत महत्त्वपूर्ण योगदान देणारा एक दिग्दर्शक, अभिनेता म्हणजे अनुराग कश्यप होय. अनेक सुपरहिट चित्रपट देणारा अनुराग कश्यप मागील काही काळापासून बॉलीवूडमधील बदलत्या वातावरणावर सातत्याने टीका करताना दिसत आहे. बॉलीवूड आता फक्त नफ्याचाच विचार करतं, सिनेमाला कला प्रकार म्हणून फारसे महत्त्व दिले जात नाही, असं तो अनेकदा म्हणत असतो. याच दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी त्याने लवकरच मुंबई सोडणार असल्याचं म्हटलं होतं. आता त्याने मुंबई शहर सोडल्याची माहिती दिली आहे.
“मी मुंबई सोडली आहे. मला फिल्म इंडस्ट्रीतील लोकांपासून दूर राहायचं आहे. इंडस्ट्री खूप टॉक्सिक झाली आहे. प्रत्येकजण अवास्तव लक्ष्याचा पाठलाग करत आहे, प्रत्येकजण ५०० कोटी किंवा ८०० कोटी रुपयांचा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करत आहे. क्रिएटिव्ह वातावरणच उरलेले नाही,” असं अनुराग द हिंदूशी बोलताना म्हणाला. आपल्या नवीन घराचं भाडं आधीच भरलंय, असं अनुरागने सांगितलं; मात्र मुंबई सोडून कोणत्या शहरात राहायला गेलाय ते अनुरागने उघड केलं नाही. पण अनुराग बंगळुरूला गेला आहे, अशी माहिती त्याच्या जवळच्या व्यक्तीने दिली आहे. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे.
इथले लोक तुम्हाला खाली खेचतात – अनुराग कश्यप
मागील अनेक दशकं ज्या शहरात राहिला, जिथे यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्याने प्रचंड संघर्ष केला, जिथे त्याचं घर होतं ते शहर सोडण्याच्या निर्णयाबद्दल अनुराग व्यक्त झाला. “खरं तर शहर ही फक्त एक रचना नसते तर तेथील लोक देखील असतात. इथले लोक… ते तुम्हाला खाली खेचतात,” असं अनुराग म्हणाला. शहर सोडण्याचा निर्णय घेणारा मी एकमेव चित्रपट निर्माता नाही, तर अनेक चित्रपट निर्मात्यांनी यापूर्वीच मुंबई सोडली आहे, असंही अनुरागने नमूद केलं. तो पुढे म्हणाला, “अनेक जण मध्य पूर्वेला निघून गेले, खासकरून दुबई. तर काही जण पोर्तुगाल, लंडन, जर्मनी, अमेरिका येथे कायमचे निघून गेले आहेत. ज्यांच्याबद्दल मी बोलत आहे, ते सर्व मुख्य प्रवाहातील चित्रपट निर्माते आहेत,” असं अनुराग म्हणाला.
मुंबई सोडल्यानंतर आयुष्यात खूप मोठा बदल झाला आहे आणि त्यामुळे ओझं कमी झाल्यासारखं वाटतंय, असं अनुराग कश्यपने सांगितलं. सध्या अनुराग आपल्या त्याच्या शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करत असून त्यासाठी भरपूर वेळ मिळत आहे. “माझा ताण खूपच कमी झाला आहे आणि मी मद्यपान करणेही सोडले आहे,” असं तो म्हणाला. लवकरच मल्याळम, हिंदी आणि एक तामिळ चित्रपट दिग्दर्शित करणार असल्याचं अनुरागने या मुलाखतीत सांगितलं.