मुलगी आलिया कश्यपने तिच्या बॉयफ्रेंडशी एंगेजमेंट केल्याची बातमी ऐकताच दिग्दर्शक अनुराग कश्यपला सुखद धक्का बसला. आलियाने बॉयफ्रेंडसह लिपलॉकचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. अनुराग त्याच्या ‘केनेडी’ चित्रपटासाठी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये होता तेव्हाच आलियाने ही पोस्ट केली. यामुळे अनुराग कश्यप खूश आहे, पण आता त्याच्या मुलीच्या लग्नाच्या खर्चासाठी त्याला अनेक रिमेक बनवावे लागणार आहेत असे तो म्हणतो. अर्थात ही गोष्ट अनुरागने मस्करीमध्ये सांगितली आहे.
आलिया कश्यप ही अनुराग आणि त्याची पूर्वपत्नी पत्नी आरती बजाज यांची मुलगी आहे. आरती बजाज या चित्रपट संपादकही आहेत. आलिया आणि शेन ग्रेगोइर खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. आलियाच्या एंगेजमेंटचे फोटो पाहून अनुराग कश्यपने प्रतिक्रिया दिली आणि एक मजेदार पोस्ट लिहिली आहे.
आणखी वाचा : “भयाण शांतता…” ‘द केरला स्टोरी’चं कौतुक करत राम गोपाल वर्मा यांनी बॉलिवूडला फटकारले
अनुराग कश्यपने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो मित्रांबरोबर बसलेला आहे. फोटोमध्ये तो फोनकडे बघताना दिसत आहे. कॅप्शनमध्ये अनुरागने लिहिले आहे की, “इथेतरी फोन वापरू नको हे ही मंडळी मला सांगून थकली. पण यांना कल्पना नाहीये की माझ्या मुलीच्या लग्नासाठी मला किती रिमेक बनवावे लागणार आहेत, त्याचाच मी हिशोब करत बसलो आहे. कारण माझी लाडकी मुलगी आलिया कश्यपने बॉयफ्रेंड शेनबरोबर साखरपुडा केला आहे आणि तेही आम्ही कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये असताना.”
अनुरागच्या या पोस्टवर त्याची मुलगी आलियाने ही ‘lol’ अशी कॉमेंट करत हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. तर सोभिता धूलीपालासह इतरही काही सेलिब्रिटीजनी अनुरागला आणि त्याच्या मुलीला शुभेच्छा दिल्या आहेत. अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘केनडी’ हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला गेला. या चित्रपटात राहुल रॉय आणि सनी लिओनी हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.