मनोरंजनसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक-निर्माते अनेकदा काही गोष्टींचा खुलासा करताना दिसतात. त्यांच्या सहकलाकारांबाबतचे किस्से, एखाद्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच्या घटना, समज-गैरसमज, चित्रपटातील एखादा सीन कसा सुचला, त्याची प्रेरणा काय, अशा एक ना अनेक गोष्टी मुलाखतींमधून समोर येतात. अनुराग कश्यप यांनी एका घटनेमुळे महेश भट्ट यांच्याबद्दलचे त्यांचे मत कसे बदलले होते, याबद्दल एका मुलाखतीत खुलासा केला होता.

२०२० मध्ये मिड-डेला दिलेल्या एका मुलाखतीत अनुराग कश्यप यांनी म्हटले होते, “महेश भट्ट यांच्या ऑफिसमध्ये घडलेली एक घटना माझी सर्वात आवडती आहे. मी त्यांच्या चित्रपटात स्क्रीप्ट लिहिण्याचे काम करत होतो. महेश भट्ट यांचे भाऊ मुकेश भट्ट पैशांबाबत खूप कंजूष होते. माझ्याकडे घराचे भाडे देण्याइतपही पैसे नव्हते. मला इंडस्ट्रीमधील माहीत असलेल्या काही चांगल्या व प्रेमळ लोकांपैकी पूजा भट्ट ही एक होती. मी तिला तिच्या वडिलांशी कामाबद्दल बोलायला सांगायचो. एकदा मी महेश भट्ट साहेब यांच्याकडे गेलो व त्यांना म्हणालो की, मी तुमच्याकडे काम करण्यापेक्षा सुतारकाम करणे पसंत करेन. त्यांचा भाऊ तिथेच असल्याने त्यांनी मला तिथे बोलणे टाळले. त्यांनी काहीतरी बोलावे याची मी वाट पाहत होतो. पण, ते एक शब्दही बोलले नाहीत. जेव्हा मी ऑफिसमधून बाहेर आलो, तेव्हा मला वॉचमनने सांगितले भट्ट साहेबांनी एक मिनिट थांबायला सांगितले आहे. ते माझ्याजवळ आले, त्यांनी माझ्या हातात १० हजार रुपये ठेवले व मला सांगितले की, तुझ्या घराचे भाडे दे आणि स्वत:ला कधीच बदलू नकोस. १९९४-९५ साली ती रक्कम खूप मोठी होती. माझे त्यानंतर त्यांच्याबद्दलचे मत बदलले.

पुढे अनुराग कश्यप यांनी म्हटले की, जेव्हा ब्लॅक फ्रायडेच्या स्क्रीनिंगला गेलो होतो, त्यावेळेला मी मुकेश भट्ट यांच्या ऑफिसमधून कसा बाहेर पडलो होतो हे सांगत होतो. कोणीतरी गर्दीतून म्हटले की, जे महेश भट्ट यांनी पैसे दिले होते, ते तू विसरलास का? भट्ट साहेब त्या गर्दीत बसले होते. मी त्यावेळी भावूक झालो होतो, अशी आठवण अनुराग कश्यप यांनी सांगितली होती.

महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केलेले अनेक सिनेमे गाजले आहेत. त्यात ‘काश’, ‘कब्जा’, ‘सडक’, ‘गुमराह’, ‘हम है राही प्यार के’, ‘चाहत’, अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. महेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्टनेदेखील बॉलीवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. अनुराग कश्यप हे सुद्धा ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘सत्या, अशा चित्रपटांसाठी ओळखले जातात.

Story img Loader