‘कान्स चित्रपट महोत्सव २०२३’ निमित्ताने बॉलीवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपट महोत्सवात अनुरागचा आगामी चित्रपट ‘केनडी’चे स्क्रीनिंग करण्यात आल्याने त्याच्या या चित्रपटाबद्दल चर्चा सुरू आहे. दरम्यान अनुरागचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो ‘केनडी’ चित्रपट बनवल्यानंतर नेमकी आर्थिक परिस्थिती काय झाली याबाबतचा खुलासा करताना दिसत आहे.
गुड बॅड फिल्म्सचे सीईओ रंजन सिंह यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी दिसत आहेत. अनुराग म्हणतो, “२०१० मध्ये जेव्हा ‘उडान’ आला तेव्हा विक्रमादित्य मोटवानी खूप गरीब होता. आज ‘केनडी’ आल्यावर मी खूप गरीब झालो आहे.” विक्रमने ‘उडान’मधून पैसे कमावले. व्हिडीओत अनुराग विक्रमादित्यला, ‘यार, उद्या दारू मिळेल काय?’ असा प्रश्नही विचारताना दिसत आहे.
साल २०१० मध्ये विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित ‘उडान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. जेव्हा हा चित्रपट कान्समध्ये प्रदर्शित झाला तेव्हा अनुराग कश्यपने विक्रमादित्य मोटवानीला पाठिंबा दिला होता. आता ‘केनडी’ प्रदर्शित होत असताना विक्रमादित्य अनुरागला सपोर्ट करत आहे.
अनुराग कश्यपने ‘केनडी’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. राहुल भट्टच्या आधी, अनुराग कश्यपला साउथ सिनेमाचा सुपरस्टार चियान विक्रमला मुख्य अभिनेता म्हणून कास्ट करायचे होते. फिल्म कॅम्पेनरला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अनुरागने खुलासा केला होता की, या चित्रपटासाठी प्रथम दाक्षिणात्य अभिनेता चियान विक्रमची निवड करण्यात आली होती. अनुरागने विक्रमशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला, मात्र काही कारणास्तव संपर्क होऊ शकला नाही. यानंतर अनुरागने चित्रपटाची कथा राहुल भट्टला ऐकवली आणि त्याने त्यात काम करण्यास होकार दिला.