बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रभावशाली चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे. आपल्या हटके शैलीसाठी आणि नव्या प्रतिभावान कलाकारांना काम देण्यासाठी तो ओळखला जातो. त्याच्या चित्रपटात बॉलीवूडमधील आघाडीचे कलाकार नसले तरी चित्रपट हिट होतात.
नुकत्याच आलेल्या ‘हड्डी’ या चित्रपटात अनुरागने हटके भूमिका साकारली आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त तो विविध माध्यमांशी संवाद साधताना आपल्याला दिसत आहे. नुकतंच अनुरागने अभिनेता झीशान अय्यूबबरोबर ‘जिस्ट’च्या टाउनहॉल’ या यूट्यूब चॅनलवरील कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी अनुरागने वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं.
चित्रपटसृष्टीत झालेले बदल ते इंडिया की भारत यावरून होणारे वाद या सगळ्या मुद्द्यांवर अनुरागने त्याचे विचार मांडले. देशातील सामाजिक, राजकीय वातावरण नेमकं कधीपासून गढूळ होऊ लागलं याबद्दल अनुरागला विचारण्यात आलं तेव्हा त्याने यावर स्पष्टपणे उत्तर दिलं.
अनुराग म्हणाला, “माझ्यामते २०१४ आणि खासकरून २०१६ नंतर हा बदल आपल्याला जाणवू लागला. २०१६-१७ नंतर मित्रांमध्येसुद्धा भांडणं होऊ लागली. आम्ही भिन्नभिन्न विचारांची लोक एकत्र बसून खायचो, गप्पा मारायचो आमच्यातही दरी निर्माण व्हायला सुरुवात झाली. मी नास्तिक आहे, पण मला कुणी मंदिरात घेऊन गेलं तर मी आवर्जून जातो, मी तेव्हा विरोध करत नाही. एखाद्याच्या घरातील रीती रिवाज परंपरा मी पाळतो. मी टॅक्समध्ये सुद्धा चालकाला विचारल्याशिवाय सिगारेट ओढत नाही. कुणी श्रद्धेने मला प्रसाद दिला तर मी तो प्रसाद समजूनच ग्रहण करतो. आपण असेच लहानाचे मोठे झालो आहोत.”
पुढे अनुराग म्हणाला, “मी माझे विचार इतरांवर कधीच थोपवत नाही, मी आहे हा असा आहे. समोरच्या व्यक्तीचा त्याच्या भावनांचा मी आदर करतो. मी बनारसमध्ये घाटावर वाढलो आहे, तिथली शांतता मला प्रचंड आवडते पण तिथे होणारा व्यवसाय मात्र मला खटकतो. माझं आयुष्य हे असंच आहे, पण आजच्या काळात ही गोष्ट कठीण आहे अन् याची अपेक्षा दुसऱ्यांकडून ठेवणं तर आणखी कठीण आहे.”