बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. गेले काही महीने ती मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतंच अनुष्काने ‘पुमा’ या आंतरराष्ट्रीय ब्रॅंडला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेले अनुष्काचे फोटो रिपोस्ट करत अनुष्काने त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
‘पुमा’च्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांनी त्यांच्या काही कपड्यांची जाहिरार करण्यासाठी अनुष्का शर्माचे त्या आऊटफिटमधले काही फोटो शेअर केले होते. हे फोटो पाहताच अनुष्काने ते शेअर करत त्यांची कानउघडणी केली आहे. परवानगीशिवाय फोटो वापरल्याने अनुष्का त्यांच्यावर चांगलीच भडकली आहे.
आणखी वाचा : अनिल कपूर यांनी केली ‘कांतारा’स्टार रिषभ शेट्टीकडे विनंती, म्हणाले “पुढचा चित्रपट…”
‘पुमा’ची ती पोस्ट शेअर करत अनुष्काने लिहिलं की, “हॅलो पुमा, मी तुमच्या ब्रॅंडची अम्बॅसडर नसल्याने माझे कोणतेही फोटो जाहिरातीसाठी पोस्ट करण्याआधी तुम्ही माझी परवानगी घ्यायला हवी, हे तुम्हाला ठाऊक असेलच. कृपया ती पोस्ट हटवा.” अनुष्काने रागाचे इमोजी टाकत ही तक्रार केली आहे. मजेची बाब अशी की अनुष्काचा पती आणि क्रिकेटर विराट कोहली याने मात्र ही पोस्ट लाइक केल्याचं आढळून आलं आहे.
अनुष्काच्या पोस्टची अजून दखल घेतली गेली नसली तरी ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. नुकतंच अनुष्का आणि विराटने त्यांच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा केला. अनुष्का सध्या ‘छकडा एक्सप्रेस’ या बायोपिकवर काम करत आहे. यामध्ये अनुष्का महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.