गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ आणि गायक-रॅपर एपी ढिल्लन यांच्यातील वाद सध्या चांगलाच चर्चेत आहे. एपी ढिल्लनने चंदीगडमधील त्याच्या कॉन्सर्टमध्ये दिलजीत दोसांझला, “इन्स्टाग्रामवरून आधी अनब्लॉक कर, मग बोल,” असे विधान केले. यापूर्वी दिलजीतने त्याच्या इंदोर कॉन्सर्टमध्ये एपी ढिल्लन आणि करन औज या दोघांना शुभेच्छा दिल्या होत्या.
दिलजीतच्या ‘दिल-ल्यूमिनाटी इंडिया टूर’ च्या इंदोर कॉन्सर्टमध्ये दिलजीतने सांगितले, “माझ्या दोन भावांनी टूर सुरू केला आहे, करन औजला आणि एपी ढिल्लन. त्यांना शुभेच्छा!”
मात्र, चंदीगडमधील शोमध्ये एपी शोमध्ये ढिल्लनने त्याच्यात आणि दिलजीतमध्ये अप्रत्यक्षपणे वाद असल्याचे सूचित केले. तो म्हणाला, “भाऊ, एक छोटी गोष्ट सांगायची आहे, आधी मला इन्स्टाग्रामवर अनब्लॉक कर, मग बोल.बाकी काय मार्केटिंग होत आहे हे मला माहिती नाही. पण मी तीन वर्षांपासून मेहनत करत आहे. तुम्ही कधी मला कोणत्याही वादात अडकताना पाहिले आहे का?”
दिलजीत दोसांजने इन्स्टाग्रामवर त्वरित उत्तर दिले. त्याने पंजाबीमध्ये लिहिले, “मी तुला कधीच ब्लॉक केले नाही.माझे सरकारशी पंगे होऊ शकतात, कलाकारांशी नाही.” एपी ढिल्लनने दिलजीतने त्याला ब्लॉक केल्यावरचा एक व्हिडीओ आणि ब्लॉक लिस्टमधून काढल्यानंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यानंतर एपी ढिल्लनने त्याची बाजू मांडण्यासाठी एक स्टोरी इन्स्टाग्रामवर टाकली आहे.
दिलजीतचा ‘दिल-ल्यूमिनाटी इंडिया टूर’हा दौरा २९ डिसेंबर २०२४ ला संपणार आहे. त्याच्या हा दौरा काहीसा वादग्रस्त ठरला. तेलंगणामध्ये दिलजीतला गाण्यात मद्य, ड्रग्स किंवा हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या गाण्यांवर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याचप्रमाणे, चंदीगडमधील त्याच्या कार्यक्रमासाठी आवाज मर्यादा उल्लंघनाबद्दल आयोजकांना नोटीस मिळाली. चंदीगड इव्हेंटदरम्यान दिलजीतने भारतातील कॉन्सर्टच्या सोयीसुविधांवर नाराजी व्यक्त केली आणि म्हणाला, “योग्य सुविधा नसतील, तर मी पुन्हा देशात परफॉर्म करणार नाही.” दरम्यान, एपी ढिल्लनने चंदीगडमध्ये ‘द ब्राउनप्रिंट टूर’संपवला. याआधी त्याने नवी दिल्ली आणि मुंबईतही परफॉर्म केले होते.
© IE Online Media Services (P) Ltd