अपारशक्ती खुरानाचा अभिनय क्षेत्रातील प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. पण, त्याआधी त्याचे एक स्वप्न होते – क्रिकेटपटू बनण्याचे. चंदीगडमध्ये लहानाचा मोठा झालेल्या अपारशक्तीने आपले संपूर्ण बालपण क्रिकेटसाठीच समर्पित केले होते. क्रिकेटच्या वेडाने झपाटलेल्या अपारशक्तीने त्याच्या प्रत्येक क्षणात क्रिकेटला जागा दिली होती. मात्र, एका प्रसंगाने त्याच्या आयुष्याचा प्रवास बदलून गेला. एका अलीकडच्या मुलाखतीत आपल्या क्रिकेटच्या दिवसांतील एक कटू आठवण त्याने सांगितली आहे.

शुभांकर मिश्रा यांच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना अपारशक्तीने सांगितले की, प्रशिक्षकाने संघात काही वरिष्ठ खेळाडूंना घेतल्यामुळे त्याला असुरक्षित वाटू लागले. त्याने आपल्या कर्णधारपदाच्या सुरक्षेसाठी दुसऱ्या संघाच्या प्रशिक्षकाला आपल्या संघातील वरिष्ठ खेळाडूंवर आक्षेप घ्यावा असा विचार केला. मात्र, दुसऱ्याच दिवशी सरावाच्या ठिकाणी प्रशिक्षकांनी त्याला बाजूला बसवले. अपारशक्ती सांगतो, “मी इतका लहान होतो की हे मला समजू शकले नाही की दोन्ही प्रशिक्षक एकमेकांचे मित्र असतील.” यामुळेच अपारशक्तीच्या डावपेचांबद्दल प्रशिक्षकांना समजले आणि त्यामुळे त्याला संघात संधी नाकारण्यात आली.

हेही वाचा…Ghajini 2 : एकच सिनेमा, सारखेच पात्र, पण भूमिका साकारणार दोन अभिनेते; आमिर खान आणि दाक्षिणात्य स्टार ‘गजनी २’मध्ये दिसणार

वडिलांनी दिलेला शिस्तीचा धडा

सरावाच्या दरम्यानच अपारशक्तीचे वडील योगायोगाने मॉर्निंग वॉकसाठी अकॅडमीमध्ये आले. त्यांनी अपारशक्तीला बाजूला बसलेले पाहिले आणि प्रशिक्षकाकडे त्याचा खेळ बंद का केला, याबाबत विचारणा केली. प्रशिक्षकाने त्यांना खरी परिस्थिती सांगितल्यानंतर, अपारशक्तीचे वडील संतापले आणि त्याला घरी घेऊन निघाले. रस्त्यात त्यांनी अपारशक्तीला बॅटने चोप दिला. अपारशक्ती आठवण सांगताना म्हणतो, “तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण माझ्या वडिलांनी मला एक किलोमीटर अंतरापर्यंत मारतच घरी नेलं.”

घरी आल्यावर वडिलांनी त्याला एक महत्त्वाचा सल्ला दिला, जो त्याच्या जीवनाचा धडा ठरला. ते म्हणाले, “गुरुचा अपमान करणाऱ्याला ब्रह्मा-विष्णू-महेश (देव) सुद्धा मदत करू शकत नाहीत.”

हेही वाचा…ऐन तारुण्यात बॉलीवूड करिअर सोडून धरली होती ओशोंच्या आश्रमाची वाट, अमिताभ बच्चन यांनी समजूत घातली, पण…

या घटनेनंतर अपारशक्तीने आपले वर्तन सुधारले आणि गुरुंच्या आदराचे महत्त्व जाणले. तो म्हणतो, “आजही जर माझ्यापेक्षा कोणी लहान व्यक्ती मला प्रशिक्षण देत असेल, तरी मी त्यांना आदराने ‘सर’ म्हणतो.”

हेही वाचा…घटस्फोटित अन् एका मुलाची आई असलेल्या किरण यांच्या प्रेमात पडले होते अनुपम खेर, ‘अशी’ झाली होती पहिली भेट

अभिनयात यशाचा प्रवास

क्रिकेटचे स्वप्न अधुरे राहिल्यानंतर अपारशक्तीने अभिनयाकडे वळण्याचा निर्णय घेतला. २०१६ पासून अभिनयात सक्रिय असलेल्या अपारशक्तीने आपली ओळख एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून निर्माण केली आहे. नुकताच तो ‘स्त्री २’ आणि ‘बर्लिन’ या चित्रपटांत झळकला, ज्यात त्याने आपल्या अभिनय कौशल्याची छाप सोडली आहे.