अभिनयाचे बादशाह म्हणून अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांची ओळख आहे. त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका प्रचंड गाजल्या. जगभरात त्यांचे लाखो-करोडो चाहते आहेत. अनेक दिग्दर्शक, सहकलाकार, कनिष्ठ कलाकार त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव अनेकदा सांगतात. आता दिग्दर्शक अपूर्व लखिया यांनी अमिताभ बच्चन यांच्याबाबतची एक आठवण सांगितली आहे. दुष्काळ असलेल्या जैसलमेरमध्ये शूटिंग सुरू असताना अमिताभ बच्चन आले आणि अचानक त्याच वेळी पाऊस सुरू झाला, अशी आठवण त्यांनी सांगितली.

त्यांनी अभिषेकला मिठी मारली…

दिग्दर्शक अपूर्व लखिया यांनी नुकतीच ‘फ्रायडे टॉकिज’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी म्हटले, “आम्ही जैसलमेरमध्ये मुंबई से आया मेरा दोस्त या चित्रपटाचे शूटिंग करीत होतो. त्यावेळी तिथे दुष्काळ पडला होता. या चित्रपटात अभिषेक बच्चन काम करीत होते. नवीन वर्षाच्या निमित्तानं अमिताभ बच्चन त्यांच्या कुटुंबासह तिथे भेटण्यासाठी आले होते. जया बच्चन, श्वेता, अमर सिंग त्यांच्याबरोबर होते. आम्ही कुठे तरी वाळवंटात शूटिंग करीत होतो. त्यांच्या गाड्यांचा ताफा आल्याचे आम्हाला दुरूनच समजलं. त्यांचा ताफा आमच्या सेटजवळ आला तेव्हा आकाशात काळे ढग जमा होत होते. ते गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी अभिषेकला मिठी मारली. त्यावेळी गारपीट सुरू झाली होती. ‘लगान’ चित्रपटातील सीनप्रमाणे ते दृश्य होते. त्यानंतर खूप पाऊस पडला. नद्यांना पूर आले. काही गावं उद्ध्वस्त झाली. त्यानंतर अमिताभ बच्चन ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या ठिकाणी ४०-५० हजार लोकांच्या समुदायानं गर्दी केली होती. त्यांना अमिताभ बच्चन यांच्या पाया पडायचे होते. त्यांना वाटत होतं की, अमिताभ बच्चन यांच्या येण्यामुळे पाऊस पडला अन् नद्यांना पाणी आलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या रूपात जणू देव आला आहे. हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. हा जरी निव्वळ योगायोग असला तरी ते सर्व पाहताना अंगावर काटा आला होता.”

२००५ ला अपूर्व लखिया यांनी एक अजनबी या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केले होते. अमिताभ बच्चनदेखील हेही अनेकदा त्यांच्या ब्लॉगमधून, तसेच ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावरून अनेक गोष्टी शेअर करतात. बऱ्याचदा त्यांच्या आयुष्यातले अनुभव, एखाद्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काय घडले, याचे किस्से सांगताना दिसतात. आता अमिताभ बच्चन आगामी काळात कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader