‘लगान'(Lagan) हा चित्रपट सर्वोत्कृष्ट सिनेमांपैकी मानला जातो. आमिर खानने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. आशुतोष गोवारीकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.या चित्रपटात अपूर्व लाखिया यांनी आशुतोष गोवारीकर यांचे असिस्टंट म्हणून काम केले होते. अपूर्व लखिया यांची काम करण्याची पद्धत वेगळी होती. त्यांनी कलाकारांबाबत अनेक गोष्टी बदलल्या होत्या. ते सर्वांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत असत. सगळे त्यांना हिटलरही म्हणतही असत. आता यावर अपूर्व लाखिया यांनी एका मुलाखतीत वक्तव्य केले आहे.
आमिर खानला बसजवळ पोहोचायला उशीर…
अपूर्व लाखिया यांनी नुकतीच फ्रायडे टॉकीजला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी लगान सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचे किस्से सांगितले. त्यांनी म्हटले, “लगानच्या शूटिंगवेळी मी आमिरला सांगितले की कोणीही त्यांची खासगी गाडी आणणार नाही. सगळे कलाकार एकत्र एकाच बसने प्रवास करतील. त्यामुळे कोणालाही उशीर होणार नाही. आमिरने यावर मला सांगितले की आपल्या सिनेमात काही जेष्ठ कलाकारही आहेत. पण मी कोणतेही कारण ऐकून घेतले नाही. सर्वांनी एकाच बसने प्रवास करायचा असे ठरवले. जेव्हा सर्व कलाकार गुजरातमध्ये शूटिंगसाठी राहत होते. त्यावेळी मी प्रत्येक मजल्यावर मोठी घड्याळे लावली. मी त्यांना सांगितले की याच घड्याळातील वेळ सर्वांनी पाळली पाहिजे. मी सगळ्यांना सांगितले होते की अमुक वेळेला बस शूटिंगसाठी निघेल. पण, तिसऱ्या दिवशी आमिर खानला बसजवळ पोहोचायला उशीर झाला. बाकी सगळे आपापल्या जागेवर बसले होते. रोनित रॉय सिक्युरिटी सांभाळत होता. सगळे माझ्याकडे बघत होते. मी आता करणार, असा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मला थोडी अस्वस्थतता वाटत होती. मात्र, मला माहित होते की मला एक उदाहरण तयार करायचे आहे.
मी ड्रायव्हरला गाडी चालू करण्यासाठी सांगितले. पण, आमिर आला नसल्याने त्याने नकार दिला. रोनित आमिरची वाट बघत बसच्या दरवाज्यात उभा होता. एक वेळ अशी आली की मी रोनित रॉयला बसमधून खाली ढकलले. तो खाली पडला. ड्रायव्हरची मान पकडली व त्याला सांगितले की तू गाडी सुरू केली नाहीस तर मी तुझी मान मोडेन. त्यानंतर बस सुरू झाली. आमिर त्यानंतर दोन तासानंतर सेटवर पोहोचला. कारण- तिथे कोणाचाही गाडी उपलब्धच नव्हती. मला अनेकांनी सांगितले की तुझ्या अशा वागण्याचा तुला तोटा होऊ शकतो. तुला कामावरून काढू शकतात. पण, आमिरने कधीच काहीच बोलले नाही”, अशी आठव अपूर्व लाखिया यांनी सांगितली.