AR Rahman And Saira Banu Part Ways After 29 Years Of Marriage : भारताचे लोकप्रिय व ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रेहमान यांच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. संगीतकार ए आर रेहमान आणि सायरा बानू यांनी वैवाहिक जीवनात एकमेकांपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली आहे. २९ वर्षांच्या संसारानंतर हे दोघंही घटस्फोट घेणार आहेत.
सायरा बानू व ए आर रेहमान यांच्या वकील वंदना शाह यांनी या जोडप्याच्या विभक्त होण्याच्या निर्णयाबाबत एक निवेदन जारी केलं आहे.
निवेदनात असं लिहिलं आहे की, “श्रीमती सायरा आणि त्यांचे पती प्रख्यात संगीतकार अल्लाहक्का रेहमान (ए. आर. रहमान) या दोघांच्या वतीने आणि त्यांच्या सूचनेनुसार, वंदना शाह आणि असोसिएट्स या जोडप्याच्या विभक्त होण्याच्या निर्णयाबद्दल पुढील निवेदन जारी करत आहेत.”
“लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर श्रीमती सायरा यांनी पती ए आर रेहमानपासून वेगळं होण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांच्या नात्यातील भावनिक तणावानंतर घेण्यात आला आहे. या जोडप्याचं एकमेकांवर प्रेम असूनही त्यांच्या नात्यात तणाव व अडचणी निर्माण झाल्या होत्या. या अडचणी कोणालाही दूर करता येणार नाहीत असं सायरा यांनी सांगितलं आहे. या आव्हानात्मक व कठीण काळात समजूदारपणा दाखवून सर्वांनी त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करावा अशी विनंती सायरा यांनी सर्वांना केली आहे. कारण, आयुष्यातील सर्वात कठीण काळातून त्या सध्या जात आहेत” असं या निवेदनात जारी करण्यात आलं आहे.
हेही वाचा : २०२५ साठी शाहरुख खानची मोठी घोषणा! आर्यन करणार ‘या’ क्षेत्रात पदार्पण, तर पत्नी गौरी…; पोस्ट शेअर करत म्हणाला…
ए आर रेहमान आणि सायरा यांचा निकाह १९९५ मध्ये झाला होता. या जोडप्याला खतिजा, रहीमा आणि आमीन अशी तीन मुले आहेत.
दरम्यान, घटस्फोटाच्या घोषणेनंतर, रहेमान यांचा मुलगा आमीनने आमच्या प्रायव्हसीचा आदर करा असं आवाहन करणारी एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. “या काळात प्रत्येकाने आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा अशी आम्ही विनंती करतो. तुम्ही आम्हाला समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.” असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
© IE Online Media Services (P) Ltd