भारताचे लोकप्रिय व ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रेहमान आणि सायरा बानू यांनी वैवाहिक जीवनात एकमेकांपासून विभक्त होत असल्याची घोषणा गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात केली होती. लग्नाच्या २९ वर्षांनी दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आता सायरा यांच्याबद्दल महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आलेली आहे. याबाबत सायरा यांच्या टीमने व त्यांच्या वकील वंदना शाह यांनी निवेदन शेअर करत माहिती दिली आहे.
वंदना शाह यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. “काही दिवसांपूर्वी सायरा रेहमान यांना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली होती. या कठीण काळात, प्रकृती पुन्हा कशी बरी होईल यावर त्यांचं लक्ष आहे.” असं वकिलांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“चाहत्यांनी व्यक्त केलेल्या त्यांच्या काळजीबद्दल आभार…तसेच लॉस एंजेलिसमधील मित्र, रसूल पुकुट्टी आणि त्यांची पत्नी शादिया तसेच रहेमान यांनी कठीण काळात दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचेही आभार. त्यांचा दयाळूपणा आणि त्यांनी दिलेला पाठिंबा याची मी खरोखरच आभारी आहे.” वंदना यांनी शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.
ए आर रेहमान आणि सायरा यांचा निकाह १९९५ मध्ये झाला होता. या जोडप्याला खतिजा, रहीमा आणि आमीन अशी तीन मुले आहेत. १९ नोव्हेंबर २०२४ मध्ये ए आर रेहमान आणि सायरा यांनी विभक्त होत असल्याची घोषणा केली.
दरम्यान, घटस्फोटाच्या घोषणेनंतर, रहेमान यांचा मुलगा आमीनने आमच्या प्रायव्हसीचा आदर करा असं आवाहन करणारी एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. “या काळात प्रत्येकाने आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा अशी आम्ही विनंती करतो. तुम्ही आम्हाला समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.” असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं होतं.