AR Rahman : आपल्या अनेक श्रवणीय गाण्यांनी चर्चेत राहणारे प्रसिद्ध संगीतकार म्हणजे ए. आर. रेहमान. आजवर त्यांनी त्यांच्या गाण्यांद्वारे रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे. संगीतातील योगदानाबद्दल त्यांना ‘ऑक्सर’ हा मानाचा पुरस्कारही मिळाला आहे. असे आपल्या गाण्यांनी चर्चेत राहणारे ए. आर. रेहमान काही महिन्यांपुर्वी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांनी पत्नी सायरा बानोपासून विभक्त होण्याची घोषणा केली. या बातमीने रहमानच्या चाहत्यांना धक्का बसला होता.

घटस्फोटाच्या निर्णयानंतर झालेल्या ट्रोलिंगवर रेहमान यांचं भाष्य

१९ नोव्हेंबर २०२४ रोजी वकिलांनी एक निवेदन जारी करत दोघांच्या घटस्फोटाची माहिती दिली होती. शिवाय स्वत: ए. आर. रेहमान यांनीही सोशल मीडियावर “लग्नानंतर ३० वर्ष पूर्ण करू अशी अपेक्षा होती. पण प्रत्येक गोष्टीचा एक अनोखा अंत असतो” असं म्हणत त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं होतं. रेहमान यांच्या या घटस्फोटाच्या निर्णयानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. मात्र तेव्हापासून आतापर्यंत रेहमान यांनी शांत राहण्याचा निर्णय घेतला.

“इथे देवालाही टीका सहन करावी जाते. मग मी कोण?”

अशातच आता रेहमान यांनी या सगळ्यावर मौन सोडलं आहे. घटस्फोटाच्या निर्णयानंतर झालेल्या ट्रोलिंगबद्दल रेहमान यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नयनदीप रक्षितबरोबरच्या संभाषणात रेहमान यांनी असं म्हटलं की, “सार्वजनिक आयुष्य जगण्याचा निर्णय मी जाणूनबुजून आणि विचारपूर्वक घेतला आहे. जिथे प्रत्येकाची समीक्षा केली जाते. अगदी सर्वांत श्रीमंत व्यक्तीपासून देवापर्यंतही.. प्रत्येकाला इथे टीका सहन करावी जाते. मग मी कोण आहे?”

“मी एखाद्याच्या कुटुंबीयांबद्दल बोललो तर, ते माझ्याही कुटुंबाबद्दल बोलणार”

या मुलाखतीत रेहमान यांनी ट्रोलिंगविषयी बोलताना माझा कर्मावर विश्वास असल्याचं सांगितलं. “कर्म नावाची एक गोष्ट असते. जर मी एखाद्याच्या कुटुंबीयांबद्दल काही बोललो तर, कोणीतरी माझ्याही कुटुंबाबद्दल बोलणार. कोणी विनाकारण काही बोलणार नाही; कारण प्रत्येकाला आई, बहीण आणि पत्नी आहे. तरी माझ्या कुटुंबीयांबद्दल कोणी काही बोलत असेल तर मी देवाकडे प्रार्थना करतो की, कृपया त्यांना माफ कर आणि त्यांना योग्य मार्ग दाखव.”

नात्यातील भावनिक ताणामुळे रेहमान यांचा विभक्त होण्याचा निर्णय

दरम्यान, ए. आर. रेहमान व सायरा बानो यांनी याआधी एका निवेदनाद्वारे विभक्त होण्याची घोषणा केली होती. दोघेही बराच वेळ या गोष्टीचा विचार करत होते. घाईघाईत कोणताही निर्णय झालेला नाही. सायरा यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितलेलं की, त्या आता हे नातं वाचवू शकत नाहीत. नात्यातील अत्यंत भावनिक ताणामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. रेहमान आणि सायरा बानो यांनी १२ मार्च १९९५ रोजी चेन्नईत लग्न केलं होतं. त्यांना खतीजा, रहीमा आणि अमीन ही तीन मुलं आहेत.