आर्टिफिशियल इंटेलिजेन्स म्हणजेच एआय (AI) हा शब्द आपल्या सर्वांना परिचयाचा झाला आहे. एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून अलीकडे भन्नाट प्रयोग केले जातात. म्हातारपणी आपण कसे दिसू? ते जगाचा शेवट होईल तेव्हा माणसाचे रूप कसे असेल, अशा सगळ्या प्रकारचे फोटो एआयच्या (AI) माध्यमातून बनवता येतात. परंतु हे तंत्रज्ञान आपल्या नव्या पिढीसाठी ‘शाप आहे की वरदान?’ यावर आपल्या देशातील संगीतकार ए. आर. रेहमान यांनी चिंता व्यक्त करीत एक ट्वीट केले आहे. त्यांच्या अनेक चाहत्यांनी या ट्वीटवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
ऑस्कर विजेते भारतीय संगीतकार ए. आर. रेहमान यांनी एआयच्या (AI)वाढत्या वापराबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विटरवर ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ यांनी तयार केलेला व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून चिनी शाळांमध्ये एआय (AI)तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे केला जातो याची माहिती मिळते. मुलांच्या प्रगतीचा अहवाल एआयच्या माध्यमातून थेट शिक्षक आणि पालकांपर्यंत पोहोचवला जातो, यासाठी सगळी मुलं शाळेत गेल्यावर डोक्यावर हेडबॅॅण्ड परिधान करतात. एवढेच नाही तर मुलांवर सतत रोबोटिक तंत्रज्ञानाच्या आधारे लक्ष ठेवले जाते आणि हजेरीसुद्धा एआयचा वापर करून घेण्यात येते. तसेच मुलांच्या गणवेशामध्ये चीप लावल्यामुळे ही मुले दिवसभर कुठे-कुठे जातात यावरसुद्धा लक्ष ठेवले जाते.
हेही वाचा : चाहत्याने भर कॉन्सर्टमध्ये खेचला अरिजित सिंहचा हात; गायक थरथरत म्हणाला,”प्लीज स्टेजवर…”
हेही वाचा : ‘स्वाभिमान’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप! अभिनेत्रीची भावुक पोस्ट, म्हणाल्या, “लवकरच मी…”
ए. आर. रेहमान यांनी हा व्हिडीओ शेअर करीत, “मला नव्या पिढीची दया येते…हे नवे तंत्रज्ञान त्यांच्यासाठी ‘शाप आहे की वरदान?’ हे येणारा काळच सांगेल.” असे म्हटले आहे. त्याच्या या ट्वीटवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे, “हा व्हिडीओ बघून हॉरर चित्रपटाची आठवण येते,” तर दुसऱ्या एका युजरने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “निश्चितपणे हे तंत्रज्ञान समाजासाठी शाप आहे कारण, यामुळे लहान मुलांची विचार करण्याची क्षमता कमी होऊन, ही मुले तांत्रिक मशीनवर लाइफ जगत आहेत.”