AR Rahman wife Saira Banu: ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रेहमान यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली होती. डिहायड्रेशनमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र आता त्यांची प्रकृती सुधारली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अपोलो हॉस्पिटल आणि त्यांचा मुलगा एआर अमीनने वडिलांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. याचदरम्यान एआर रेहमान यांची पत्नी सायराने एक व्हॉईस नोट शेअर करत मोठा खुलासा केला आहे.
सायराने सांगितलं की एआर रेहमान यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती, त्यानंतर त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली आणि आता ते ठीक आहेत. सायराने स्पष्ट केलं की तिचा आणि एआर रेहमान यांचा घटस्फोट झालेला नाही. ते अजूनही पती-पत्नी आहेत. सायरा नेमकं काय म्हणाली, ते जाणून घेऊयात.
नोव्हेंबर २०२४ मध्ये एआर रेहमान आणि सायरा बानो यांनी वेगळे होत असल्याची घोषणा केली होती. सायराच्या वकील वंदना शाह यांनी अधिकृत निवेदनात या जोडप्याच्या घटस्फोटाची घोषणा केली होती. त्यानंतर काही महिन्यांनी आता एआर रेहमान यांची प्रकृती बिघडल्याने सायराने व्हॉइस नोट शेअर केली, ज्यात तिने तिला लोक एआर रेहमान यांची पूर्वाश्रमीची पत्नी म्हणतात त्याबद्दल आक्षेप घेतला आहे.
सायराने नेमकं काय म्हटलंय?
“ते लवकर बरे व्हावे. मला मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या छातीत दुखत होतं आणि त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली आहे. पण आता ते ठिक आहेत. मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की आमचा अधिकृतपणे घटस्फोट झालेला नाही. आम्ही अजूनही पती-पत्नी आहोत. गेल्या दोन वर्षांपासून माझी तब्येत ठीक नव्हती आणि मला त्यांना जास्त ताण द्यायचा नव्हता म्हणून आम्ही वेगळे झालो. पण प्लीज मला त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी म्हणू नका,” असं सायराने व्हॉइस नोटमध्ये म्हटलं आहे. तसेच कुटुंबियांनी त्यांची काळजी घ्यावी, असंही ती म्हणाली.
चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलने एआर रहमान यांच्या प्रकृतीबद्दल अधिकृत निवेदन जाहीर केले. त्यानुसार, एआर रहमान यांना डिहायड्रेशनची लक्षणं होती. एआर रेहमान रमजानचा पवित्र महिना असल्याने रोजे ठेवत होते, त्यामुळे कदाचित त्यांना डिहायड्रेशन झाले असावे. दरम्यान, काही काळापूर्वी एआर रेहमान यांच्या पत्नी सायरा बानो यांनाही याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.