बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराने (Malaika Arora) मुलगा अरहान खानबरोबर मुंबईतील वांद्रे भागात नवीन रेस्टॉरंट सुरू केले. ‘स्कार्लेट हाउस’ असे या रेस्टॉरंटचे नाव आहे. ‘स्कार्लेट हाउस’मध्ये आज खास पाहुण्यांनी हजेरी लावली. सोशल मीडियावर मलायकाच्या रेस्टॉरंटबाहेरील काही व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मलायका अरोरा आधी रेस्टॉरंटमध्ये गेली होती. त्यानंतर मलायकाचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान व खान कुटुंबातील इतर सदस्य ‘स्कार्लेट हाउस’मध्ये पोहोचले. पल्लव पालिवालच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत अरबाज खान, त्याची आई सलमा खान, बहीण अलविरा खान व तिचे कुटुंब, सलीम खान, सोहेल खानचा मुलगा निर्वाण हे सर्वजण पाहायला मिळत आहेत. अरहान आजी हेलन यांना घेऊन रेस्टॉरंटमध्ये जातानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अरबाजची दुसरी पत्नी शुरा खान नव्हती.
पाहा व्हिडीओ –
मलायकाने मुलगा अरहानबरोबर मिळून नवीन व्यवसाय सुरू केला आहे. तिच्या ‘स्कार्लेट हाउस’ या रेस्टॉरंटची सध्या चांगलीच चर्चा आहे. फरहान अख्तरसह अनेक सेलिब्रिटींनी मलायकच्या रेस्टॉरंटला भेट दिली व तेथील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. आता खान कुटुंबीयदेखील मलायका व अरहानला सपोर्ट करण्यासाठी या रेस्टॉरंटमध्ये आले.
मलायकाचे हे रेस्टॉरंट वांद्रे येथील ९० वर्षे जुन्या पोर्तुगीज बंगल्यात आहे. हे रेस्टॉरंट बोल्ड स्कार्लेट रंगात रंगवलेले आहे. हे रेस्टॉरंट खूपच सुंदर आहे. शटर विंडो, व्हिक्टोरियन खुर्च्या, फ्लोरल इंटिरियर व ग्रामोफोन यामुळे रेस्टॉरंटचा लूक लक्ष वेधून घेतो. बीना नोरोन्हा या स्कार्लेट हाऊसच्या मुख्य शेफ आहेत. त्या स्वतः मलायकासाठी हेल्दी पदार्थ बनवतात. रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये हंगामी फळांचा समावेश असलेले सॅलड्स, बाजरीचे नूडल्स, जपानी कॉफी ग्रेड मॅचा, ग्लूटेन-फ्री रॅप्स आणि ज्वारीचा रिसोटो यासारख्या पदार्थांचा समावेश आहे.