बॉलिवूड अभिनेता अरबाज खान लवकरच ‘तनाव’ वेब सीरिजमधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. इस्रायली वेब सीरिज ‘फौदा’वरून या वेब सीरिजची कथा प्रेरित आहे. या वेब सीरिजचं शूटिंग सध्या काश्मिरमध्ये सुरू असून या वेब सीरिजमध्ये देशद्रोही आणि दहशतवाद विरोधी कारवायांचं चित्रण केलं जाणार आहे. अरबाज खान या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण करत आहे आणि त्यासाठी त्याने २५ वर्षांत पहिल्यांदाच ऑडिशन दिली होती. त्याआधी त्याने कधीच कोणत्याही चित्रपटासाठी ऑडिशन न दिल्याचा खुलासा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.
अरबाज खानने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, “इस्राइलच्या ‘फौदा’वरून ‘तनाव’ची कथा प्रेरित आहे. लॉकडाऊनच्या काळात ही वेब सीरिज खूप लोकप्रिय झाली होती. मी त्यावेळी काही काळ ही वेब सीरिज पाहिली होती. पण त्याआधी या वेब सीरिजबद्दल इतर लोकांकडूनही ऐकलं होतं. त्यानंतर मी संपूर्ण वेब सीरिज पाहिली. मी एकाच आठवड्यात या वेब सीरिजचे ३ सीझन पाहिले. सामान्यतः मी असं करत नाही. पण ही वेब सीरिज पाहताना मी हे केलं.”
आणखी वाचा- बहुचर्चित ‘तणाव’चा ट्रेलर प्रदर्शित; ‘द काश्मीर फाईल्स’ पाठोपाठ आता उलगडणार काश्मीरची दुसरी बाजू
अरबाज खान पुढे म्हणाला, “मला वाटलं की भारतात अशाप्रकारच्या वेब सीरिजची गरज आहे आणि एक अभिनेता म्हणून त्यात चांगली भूमिका मला मिळावी अशी माझी इच्छा होती. कारण या वेब सीरिजमध्ये प्रत्येक वयातील व्यक्तिरेखा आहे. ‘तनाव’साठी मला अप्लॉज फिल्मने ८ महिन्यांपूर्वी कॉल केला होता. त्यानंतर कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्या ऑफिसमधून मला कॉल आला की, एका भूमिकेसाठी तुम्हाला शर्टलिस्ट करण्यात आलं आहे. तुम्ही एक ऑडिशन टेप पाठवा.”
ऑडिशनबद्दल अरबाज खान म्हणाला, “तुम्हाला खरं वाटणार नाही. पण माझ्या करिअरची सुरुवात १९९६ साली ‘दरार’ या चित्रपटातून केली होती. पण मी कोणत्याही चित्रपटासाठी कधीच ऑडिशन दिली नव्हती. मला सगळेच चित्रपट दिग्दर्शकांच्या पसंतीमुळे मिळाले. त्या काळी ऑडिशन देण्याची गरजही नसायची. त्यामुळे मी सगळे चित्रपट ऑडिशन न देताच केले. जेव्हा त्यांनी मला ऑडिशन देण्याच सांगितलं तेव्हा मला थोडं विचित्र वाटलं पण मी एका आव्हानाप्रमाणे घेतलं.”
आणखी वाचा-‘दबंग ४’ बनवण्यासाठी सलमान खान आणि अरबाज उत्सुक पण ‘ही’ आहे मोठी अडचण, दिग्दर्शकाचा खुलासा
अरबाज खानने ‘तनाव’मधील त्याचा लूक ‘फौदा’मधील मिकी मोरेनोची कॉपी असल्यासारखा दिसू नये यासाठी स्वतःच्या लूकमध्ये बरेच बदल केले आहेत. या वेब सीरिजमध्ये अरबाज खान एका बंडखोरी विरोधी युनिटच्या कमांडरची भूमिका साकारत आहे. आत्तापर्यंतच्या त्याच्या भूमिकांपेक्षा ही भूमिका पूर्णपणे वेगळी आणि मॅच्युअर आहे.