गोविंदा व त्याची पत्नी सुनीता यांच्या लग्नाला ३७ वर्षे झाली आहेत. सुनीता आहुजा फक्त १८ वर्षांची असताना तिने गोविंदाशी लग्न केलं होतं. तेव्हा गोविंदा सिनेसृष्टीत यशस्वी झाला नव्हता. त्यामुळे या जोडप्याने त्यांचे लग्न लोकांपासून लपवून ठेवले होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनीताने सांगितलं की ती १९ वर्षांची असताना तिची लेक टीनाचा जन्म झाला होता. सुनीताचे वडील तिच्या व गोविंदाच्या लग्नामुळे खूश नव्हते, त्यामुळे ते आले नव्हते, असा खुलासा टीनाने केला.
सुनिताचं लग्न झालं तेव्हा गोविंदाचं कुटुंब मोठं होतं, पण ती याच्या उलट वातावरणात वाढली होती. “माझे गोविंदाशी लग्न झाले, तेव्हा त्याचं कुटुंब मोठं होतं. मी फक्त १८ वर्षांची असताना माझे लग्न झाले. टीनाचा जन्म झाला तेव्हा मी १९ वर्षांची होते, त्यामुळे जेव्हा मला मूल झाले तेव्हा मी स्वतःही लहानच होते,” असं सुनिता हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. तसेच लग्नाआधीच गोविंदाने सुनिताला सांगितलं होतं की घरात त्याची आई म्हणेल तसंच होईल.
हेही वाचा – “कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
“त्यावेळी मी माझ्या पतीच्या खूप प्रेमात होते. त्याने मला आधीच सांगितलं होतं की माझे घर माझी आई आहे तोपर्यंत तीच सांभाळेल. ती गेल्यानंतर तुला हवं ते करू शकतेस,” असं सुनिता म्हणाली. गोविंदाला बहिणी जास्त होत्या, त्यामुळे त्यांची मुलंही गोविंदाच्या घरी राहायची. “मग मला इतर मुलांची (कृष्णा, विनय) घरात राहण्याची सवय झाली. त्यावेळी ते खूप लहान होते. मला मुलं खूप आवडतात. मला वाटतं की तुम्ही चांगलं काम केलं तर देव ते पाहत असतो, त्या मुलांना जरी त्याची जाणीव नसली तरी,” असं सुनिता म्हणाली. सुनीताने हे वक्तव्य भाचा कृष्णा आणि त्याची पत्नी कश्मीराबरोबरच्या वादावरून केलं.
सुनिता पुढे म्हणाली, “माझं गोविंदावर खूप प्रेम होतं, त्यामुळं सगळं सहन केलं.” त्यानंतर टीनाने तिच्या आईबद्दल सांगितलं. “माझी आई शॉर्ट्स घालायची, पाली हिलमध्ये राहायची, खूप श्रीमंत कुटुंबातून आली होती. त्यावेळी माझे वडील आर्थिकदृष्ट्या इतके सक्षम नव्हते. ते विरारला राहत होते, संघर्ष करत होते. माझ्या आजोबांची परिस्थिती तुलनेने खूप चांगली होती. माझ्या आईने बाबाबद्दल आजोबांना सांगितलं तेव्हा ते म्हणालेले ‘अगं तू वेडी आहेस का? तो एक संघर्ष करणारा अभिनेता आहे’. ते यांच्या लग्नालाही आले नव्हते, कारण ते या लग्नामुळे फार खूश नव्हते,” असं टीना म्हणाली.