गायक अरिजित सिंह आपल्या आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करतो. एखादा नवा सिनेमा यावा आणि त्यात अरिजितचे गाणे असावे, याची चाहते वाट बघतात. अनेक श्रोते अरिजितची जुनी हिट गाणी वेगवेगळ्या शैलीत ऐकण्यासाठी त्याच्या कॉन्सर्टला हजेरी लावतात. या कॉन्सर्टमध्ये अरिजित कधी जोडप्यांनी सांगितलेली गाणी गातो, तर आपल्या साध्या वागण्यातून, कृतीतून गातानाच चाहत्यांची मने जिंकतो. नुकत्याच एका कॉन्सर्टमध्ये अरिजितने एका चाहत्याने व्यासपीठावर ठेवलेले जेवण उचलून त्याच्या टीममधील व्यक्तीच्या हाती देत माफी मागितली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, चाहते अरिजितचे कौतुक करत आहेत.
अरिजित सिंह कॉन्सर्टच्या निमित्ताने वर्ल्ड टूर करत आहे. यात नुकताच त्याचा एक कॉन्सर्ट झाला. या कॉन्सर्टमध्ये अरिजित सिंहने ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमाचे टायटल ट्रॅक गाताना त्याने केलेल्या कृतीने चाहत्यांची मने जिंकली.
‘ऐ दिल है मुश्किल’ या गाण्यातील “मुझे आजमाती है तेरी जमीं” ही ओळ गात असताना, एक व्यक्ती त्याच्या जेवणाचा बॉक्स व्यासपीठावर अरिजितच्या पायाजवळ ठेवतो. ते पाहिल्यावर अरिजित ते जेवण उचलतो आणि तिथे असणाऱ्या त्याच्या टीममधील व्यक्तीकडे सुपूर्द करतो. यानंतर गाणं गातानाच अरिजित त्या चाहत्याची माफी मागतो. असा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरतोय.
??
— Arijitsinghupdates2.0 (@Arijitnews) September 17, 2024
Arijit Singh – I am sorry, The stage is my temple you can't put food here ? #ArijitSingh pic.twitter.com/4GLJBmeet9
काय म्हणाला अरिजित?
चाहत्याने व्यासपीठावर ठेवलेले अन्नपदार्थ अरिजितने एका बाजूला गाणं गात असतानाच त्याच्या टीममधील व्यक्तीकडे दिले. याचदरम्यान अरिजितने चाहत्याची माफी मागितली. माफी मागताना अरिजित म्हणाला, “‘हे व्यासपीठ माझं मंदिर आहे, इथे तुम्ही अन्नपदार्थ ठेवू शकत नाही.” त्याचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये चाहते अरिजितचे कौतुक करत आहेत.

एका चाहत्याने लिहिले, “अरिजितजी, ही तुमची तुमच्या कामावरची खरी भक्ती आणि निष्ठा आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देवो, तुम्हाला शुभेच्छा.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, “लव्ह लव्ह लव्ह.” आणखी एका युजरने लिहिले, “चाहत्याच्या या कृतीवर अरिजितने न रागावता ज्या नम्रतेने हे अन्नपदार्थ उचलले, ते मला आवडलं. त्याच्या अशाच कृतींमुळे हा माणूस एक दिवस लिजेंड होईल.”

एड शीरन आणि अरिजितची जोडी ‘परफेक्ट’
‘एड शीरन’ हा हॉलीवूडचा प्रसिद्ध गायक आहे. त्याचे भारतातही अनेक चाहते आहेत. याच एड शीरनचे २०१८ साली आलेले ‘परफेक्ट’ या गाण्याने यूट्यूबवर धुमाकूळ घातला होता. याच गाण्यावर अरिजित आणि एड शीरन यांनी लंडन येथे परफॉर्म करून चाहत्यांना गायनाची पर्वणी दिली. या कार्यक्रमाच्या एक दिवसानंतर अरिजित सिंहने इन्स्टाग्रामवर कॉन्सर्टमधील काही छायाचित्रे शेअर केली आहेत. यात एका फोटोमध्ये एड शीरन आणि अरिजित गिटार वाजवत असल्याचे दिसत आहे. अरिजितने या फोटोला कॅप्शन दिले आहे, “लंडन, काल रात्री तुम्ही इतके प्रेम दाखवल्याबद्दल धन्यवाद.” या कॅप्शनच्या शेवटी अरिजितने #Perfect असा हॅशटॅग वापरला आहे.