Arijit Singh Viral Video: संगीत विश्वातील सध्याचं आघाडीचं नाव म्हणजे अरिजीत सिंह. अरिजीतने आपल्या सुमधूर आवाजाने तरुणाईला अक्षरशः वेड लावलं आहे. त्यामुळेच अरिजीतचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याचं कुठलंही गाणं असो ते सुपरहिट होतंच. अरिजीत त्याच्या गाण्यांव्यतिरिक्त लाइव्ह कॉन्सर्टमुळे खूप चर्चेत असतो. त्याच्या लाइव्ह कॉन्सर्टला चाहते तुफान गर्दी करतात. नुकताच पुण्यातील एमसीए इंटरनॅशनल स्टेडियमध्ये अरिजीत सिंहचा लाइव्ह कॉन्सर्ट पार पडला. या कॉन्सर्टमधील सध्या अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे पुण्यातील कॉन्सर्टमध्ये अरिजीत सिंहने मराठी गाणं गायलं; ज्याचा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे.
‘फोटो फॅक्टर’ या इन्स्टाग्राम पेजवर अरिजीत सिंहच्या पुण्यातील लाइव्ह कॉन्सर्टमधला व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अरिजीत सिंह मराठी गाणं गाताना दिसत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘जोगवा’ चित्रपटातील ‘जीव रंगला’ ( Jeev Rangla ) गाणं अरिजीत सिंहने गाताना पाहायला मिळत आहे. अरिजीतच्या गोड आवाजात ‘जीव रंगला’ गाणं ऐकून अनेकांच्या अंगावर शहारे आले, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
अरिजीत सिंहचा हा व्हिडीओ १.८ मिलियनहून अधिक जणांनी पाहिला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “म्हणून अरिजीत सिंह खूप उत्कृष्ट गायक आहे.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “मराठी गाणं खूप छान गातो. गहिवरून आलं.” तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “काय आवाज आहे आणि जबरदस्त.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं की, मराठी गाणं गाऊन लोकांची मनं जिंकली.
दरम्यान, याआधीही अरिजीत सिंहने लाइव्ह कॉन्सर्टमध्ये मराठी गाणी गायली होती. तेव्हादेखील त्याने आपल्या गोड आवाजाने चाहत्यांची मनं जिंकली होती. अरिजीत सिंह जसा सध्या मराठी गाणं गायल्यामुळे चर्चेत आला आहे. तसाच सध्या दुसऱ्या बाजूला पंजाबी प्रसिद्ध गायक हनी सिंगदेखील चर्चेत आला आहे. हनी सिंगने त्याच्या पुण्यातील लाइव्ह कॉन्सर्टमध्ये दादा कोंडकेंचं ‘ढगाला लागली कळ’ या लोकप्रिय गाण्याच्या दोन ओळी गायल्या. तसंच श्रोत्याशी मराठीत संवाद साधला. हनी सिंगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.