अर्जुन कपूरने अनेक मुलाखतींमध्ये त्याच्या मानसिक आरोग्याशी संबंधित संघर्ष, भावनिक अस्थिरता व वैयक्तिक घटनांचा परिणाम याविषयी वक्तव्य केले आहे. अलीकडेच अभिनेत्याने शेअर केले की, शाळेत तो हुशार विद्यार्थी होता; पण पालकांच्या विभक्त होण्यामुळे त्याच्या शैक्षणिक कामगिरीवर परिणाम झाला.
‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत अर्जुन कपूरने त्याच्या शालेय जीवनातील शैक्षणिक कामगिरीबद्दल सांगितले. तो म्हणाला, “मी माझ्या पालकांच्या विभक्त होण्याआधी अभ्यासात खूप हुशार विद्यार्थी होतो. पण, माझे पालक विभक्त झाले आणि त्याचा माझा मनावर खूप मोठा परिणाम झाला. त्यामुळे माझ्या शैक्षणिक कामगिरीवर परिणाम झाला.” त्यावेळी अर्जुन कपूरचे वडील व चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी त्याला अभ्यासातून ब्रेक घेण्याचा सल्ला दिला आणि अर्जुनने तो स्वीकारला. दहावीची परीक्षा झाल्यानंतर अर्जुनने चित्रपटांच्या कामावर लक्ष केंद्रित केले.
हेही वाचा…बादशाहवर वाहतुकीचे नियम मोडल्याने झाली कारवाई? रॅपर स्वतः स्पष्टीकरण देत म्हणाला, “माझ्याकडे तर…”
उन्हाळ्याच्या सुटीत अर्जुनने आपल्या वडिलांना त्यांच्या कामात मदत करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने ‘कल हो ना हो’ या आयकॉनिक चित्रपटात सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले. मात्र, त्याच्या आई मोना शौरी या त्याच्या कॉलेज सोडून चित्रपटसृष्टीत जाण्याच्या निर्णयाने खूश नव्हत्या. तरीही अर्जुनने आपला निर्णय कायम ठेवला. त्याने सांगितले, “त्यानंतर मला शिक्षणातून ब्रेक घेण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे चांगले करिअर घडवण्यात मदत झाली.”
या मुलाखतीत अर्जुनने त्याच्या कॉलेजच्या दिवसांची आठवण सांगितली आहे. अर्जुनने सांगितले की, त्यावेळी तो खूप लठ्ठ होता. त्याला कॉलेजचे इतर विद्यार्थी काय म्हणतील याची चिंता असायची. तो म्हणाला, “मी कॉलेजमध्ये शॉर्ट्स घालून जायचो, ओव्हरसाईज कपडे घालायचो आणि शाळेची बॅग घेऊन जायचो. मी बऱ्याचदा कॉलेज बंक केले. मी अकाउंटिंगमध्ये नापास झालो; पण इतर विषयांमध्ये चांगली कामगिरी केली.”
अखेर या सगळ्या संघर्षांवर मात करीत अर्जुनने स्वतःवर मेहनत घेतली आणि ‘इश्कजादे’ या चित्रपटाद्वारे त्याने आपल्या करिअरला सुरुवात केली. हा चित्रपट हिट ठरला. व्यावसायिक आघाडीवर अर्जुन कपूर रोहित शेट्टी यांच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत झळकला होता. आता तो वरुण धवन आणि दिलजीत दोसांझबरोबर ‘नो एंट्री २’मध्ये दिसणार आहे.