गेल्या काही दिवसांपासून ‘कुत्ते’ (Kuttey) चित्रपटाची चर्चा सुरु आहे. चित्रपटाच्या हटके पोस्टरची चांगलीच चर्चा झाली होती. शिवाय चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये याबाबत उत्सुकता होती. आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये अर्जुनचा अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे. तर मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरचीही यामध्ये झलक दिसते. याबरोबर चित्रपटात थ्रिलर आणि कॉमेडीचा जबरदस्त तडका पाहायला मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटात तब्बू पोलिस ऑफिसरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे. अर्जून-तब्बूसह चित्रपटात नसीरुद्दीन शाह, कोंकणा सेन शर्मा, राधिका मदन आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचदरम्यान प्रत्येक कलाकाराने आपल्या भावना व्यक्त केल्या. याबरोबरच अर्जुन कपूरनेही या चित्रपटाशी जोडलेल्या काही आठवणी सांगितल्या.

आणखी वाचा : श्रीदेवी यांच्या नियमामुळे जान्हवी कपूरला व्हावं लागलं प्रियकरापासून वेगळं; अभिनेत्री पुन्हा करतीये एक्स बॉयफ्रेंडलाच डेट

२ वर्षांपूर्वी जेव्हा कोविडमुळे पहिला लॉकडाउन लागला तेव्हा अर्जुनला या चित्रपटासाठी विचारणा झाली होती. याविषयी बोलताना अर्जुन म्हणाला, “अभिनेता म्हणून १० वर्षं मेहनत घेतल्यानंतर मला एवढ्या मोठ्या चित्रपटात आणि एवढ्या मातब्बर लोकांबरोबर प्रथमच काम करायची संधी मिळाली आहे. या क्षेत्रात तुम्ही कायम एक विद्यार्थी असता, यश आणि अपयश हे आपल्या हातात नसतं, पण शिकणं आपल्या हातात असतं. या सगळ्या दिग्गज लोकांबरोबर काम करताना एक दडपण आणि आदरयुक्त भीती मनात होती. याचं संपूर्ण श्रेय आसमान भारद्वाजला द्यावं लागेल.”

लव्ह रंजन आणि विशाल भारद्वाज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विशाल यांनी या चित्रपटाचं संगीत दिलं असून, गुलजार यांनी गाण्यांचे शब्द लिहिले आहेत. शिवाय या डार्क कॉमेडी थ्रिलर चित्रपटाचं दिग्दर्शन आसमान भारद्वाजने केलं आहे. येत्या १३ जानेवारील चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arjun kapoor shares his experience of working with legendary actors in upcoming film kuttey avn