अर्जुन रामपाल हा बॉलीवूडमधील एक व्हर्सेटाइल अभिनेता म्हणून ओळखला जातो. कामाबरोबरच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत असतो. गेले अनेक महिने तो मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रिएड्सला डेट करत आहे. तर काही दिवसांपूर्वीच तिने ती गरोदर असल्याचंही जाहीर केलं होतं. आता ती नेटकऱ्यावर चांगलीच संतापली आहे.
गॅब्रिएला डेमेट्रिएड्स आणि अर्जुन रामपाल गेले अनेक महिने एकमेकांना डेट करत आहेत. अनेक ठिकाणी ते एकत्र दिसतात. याचबरोबर सोशल मीडियावरून ते त्यांचं एकमेकांवरील असलेलं प्रेम व्यक्त करत असतात. आता ते दोघं विवाहबंधनात अडकण्याच्या आधीच गॅब्रिएला बाळाला जन्म देणार आहे. यावरून काही दिवसांपूर्वी त्यांना ट्रोल केलं गेलं. तर आता नेटकर्याच्या एका प्रश्नावर तिने सडेतोड उत्तर दिलं आहे.
हेही वाचा : “अजय-काजोलच्या मुलीकडून ही अपेक्षा नव्हती…,” ‘त्या’ व्हायरल फोटोंमुळे नीसा देवगण ट्रोल
गॅब्रिएलाने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. या फोटोमध्ये ती तिचा बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स करत प्रतिक्रिया दिली. तर एका नेटकऱ्याने लिहिलं, “तुम्ही लग्न कधी करणार आहात? तू भारतात राहतेस. तू जिथे जन्मलीस तिथे राहत नाहीस. तुम्ही सगळे तरुणाईची मानसिकता खराब करता.” तर यावर गॅब्रिएलाही गप्प बसली नाही. तिने लिहिलं, “हो. इथल्या लोकांची मानसिकता सुंदर जिवांना या जगात आणून खराब केली गेली आहे. मागासलेल्या मानसिकतेच्या लोकांकडून नाही.”
गॅब्रिएलाची ही कमेंट आता चांगलीच चर्चेत आली आहे. तर तिच्या या कमेंटवर रिप्लाय देत अनेकांनी तिची बाजू घेत आपलं मत मांडलं आहे.