Arshad Warsi on Kalki 2898 AD: ‘कल्की 2898 एडी’ यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. या चित्रपटात बॉलीवूड व दक्षिणेतील दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. या चित्रपटात अनेक आघाडीच्या अभिनेत्याने कॅमिओ केले आहेत. नाग अश्विन दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले आणि जगभरातील बॉक्स ऑफिसवर ११०० कोटी रुपयांहून जास्त कमाई केली. पण हा चित्रपट अभिनेता अर्शद वारसीला आवडला नाही.
प्रभास (Prabhas), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), दीपिका पादुकोण (Deepika Padukone) व कमल हासन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘कल्की 2898 एडी’ पाहून निराश झाल्याचं स्पष्ट मत अर्शदने मांडलं. “मी कल्की पाहिला, मला चित्रपट अजिबात आवडला नाही. अमित जींनी अप्रतिम काम केलं आहे. मी शपथ घेऊन सांगतो की त्यांच्याकडे असलेली शक्ती थोडी आपल्याला मिळाली तर आपलं आयुष्य सेट होईल. त्यांचं काम अप्रतिम आहेत,” असं अर्शद समदिश भाटियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
प्रभासच्या भूमिकेबद्दल अर्शद म्हणाला…
अर्शदने अमिताभ बच्चन यांचं कौतुक केलं, तर दुसरीकडे त्याने प्रभासच्या भूमिकेवर सडकून टीका केली. “प्रभासला पाहून मला खरोखर खूप वाईट वाटलं. तो काय होता? तो एखाद्या जोकरसारखा वाटत होता. का? मला मॅड मॅक्स बघायचा आहे. मला मेल गिब्सनला तिथं बघायचं आहे. तुम्ही त्याला काय बनवलं, का करता असं? मला खरंच कळत नाही,” असं प्रभासच्या भूमिकेबद्दल अर्शद म्हणाला. अर्शदने या ब्लॉकबस्टर चित्रपटाबद्दल दिलेली प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आहे.
अर्शदने ‘श्रीकांत’ चित्रपटाचे केले कौतुक
Arshad Warsi on Shrikanth: दरम्यान, अर्शदने ‘श्रीकांत’ चित्रपटाचे व त्यात मुख्य भूमिका साकारणाऱ्या राजकुमार रावच्या अभिनयाचे कौतुक केले. “मी श्रीकांत पाहिला आणि मला तो खूप आवडला. मला वाटतं राजकुमारने चित्रपटात खूप छान काम केलं आहे,” असं अर्शद म्हणाला.
मराठमोळ्या नम्रता शिरोडकरने मुलांसह केलं देवदर्शन, शेअर केले खास Photos
अर्शद ‘मुंज्या’ सिनेमाबद्दल म्हणाला…
Arshad Warsi on Munjya : अर्शदने शर्वरी वाघ व नवोदित अभिनेता अभय वर्मा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या विनोदी भयपट ‘मुंज्या’चे कौतुक केले. “मी ‘मुंज्या’बद्दल खूप चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत. एक नवीन मुलगा व शर्वरी असलेला हा एक छोटासा विनोदी भयपट आहे. मला ‘किल’ देखील पाहायचा आहे. इंडस्ट्रीने आशयावर वेगवेगळे प्रयोग केले पाहिजेत. कारण दाक्षिणात्य इंडस्ट्रीही त्यांचे चित्रपट व आशयावर प्रयोग करत आहे,” असं अर्शदने नमूद केलं.